मुंबई : मास्कचे महत्व मुंबईकरांना पटवून देण्यासाठी दंडात्मक कारवाईनंतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदीचाही अवलंब महापालिकेने केला. मात्र मास्क लावण्याबाबत नागरिकांमध्ये अनेच्छा दिसून येत असल्याने आता मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका विशेष बैठकीत सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत.
महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिका-यांची विशेष बैठक 'दूरदृश्य प्रणाली’द्वारे मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, सुरेश काकाणी यांच्यासह सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, रुग्णालयाचे अधिष्ठाता, पोलीस उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांच्या सहकार्याने कारवाईबाबत प्रभाग स्तरीय नियोजन करण्याची सूचना आयुक्तांनी केली.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. विनामास्क फिरणाऱ्या ४० हजार लोकांकडून एक कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. २४ विभागांमध्ये नियुक्त संस्थांचे प्रतिनिधी व पालिका कर्मचारी यांच्याद्वारे ही कारवाई नियमित सुरु आहे. त्याचबरोबर आता पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत पालिकेच्या सर्व २४ विभागस्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करून त्यावर अंमल करण्यात येणार आहे.
----------------------------------
यांच्यावर होणार कारवाई..
दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला जाणारे नागरिक ‘विनामास्क’ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
----------------------------------
मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्याचा नियम महापालिकेने यापूर्वीच केला आहे.
९ एप्रिलपासून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर पालिकेने कारवाई सुरू केली. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस बाजारात येईपर्यंत मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
विनामास्क फिरणाऱ्या दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.