ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:51 AM2021-09-29T06:51:25+5:302021-09-29T06:51:50+5:30
दीर्घकाळ मुंबईत राहिलेले सत्यव्रत कुमार हे त्यांच्या मूळ विभागात (कस्टम आणि केंद्रीय अबकारी) परत जातील.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयातील सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रकरणे सध्या मुंबईचे कार्यालय हाताळत असताना ही बदली करण्यात आली आहे.
सत्यव्रत कुमार हे ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठविला होता. त्यास मंजुरी देण्यापूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाची मान्यता घ्यावी लागते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षांच्या समितीने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे दीर्घकाळ मुंबईत राहिलेले सत्यव्रत कुमार हे त्यांच्या मूळ विभागात (कस्टम आणि केंद्रीय अबकारी) परत जातील.
सत्यव्रत कुमार यांना सहसंचालक पदावर कायम ठेवत सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत ईडी संचालकांचे सल्लागार ही जबाबदारी देण्यात आली होती. दुसरे सहसंचालक योगेश वर्मा हे मुख्यत्वे मुंबई कार्यालयाचा कार्यभार पाहत होते. ईडीच्या मुंबई कार्यालयातील विशेष संचालक सुशीलकुमार यांना सहा महिन्यांपूर्वी प्राप्तीकर या त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले होते.