पहाटेपर्यंत जोशात रंगले सेलिब्रेशन!
By admin | Published: January 2, 2016 08:28 AM2016-01-02T08:28:52+5:302016-01-02T08:28:52+5:30
सरत्या वर्षाला बाय-बाय करत २०१६ चे स्वागत करण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांत रात्रभर सेलिब्रेशन रंगले. रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची
ठाणे : सरत्या वर्षाला बाय-बाय करत २०१६ चे स्वागत करण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांत रात्रभर सेलिब्रेशन रंगले. रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी, सोशल मीडियावरचे मेसेज आणि जल्लोष-चीत्कारांसह नवे वर्ष उजाडल्याची वर्दी मिळाली आणि जशी रात्र रंगत गेली, तसा उत्साह वाढत गेला... तो नव्या वर्षाची पहाट सरेपर्यंत.
नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर सोसायट्यांच्या गच्चीत, मैदाने, उद्यानांत, ठाण्यातील तलावपाळी असो की डोंबिवलीतील फडके रोड, कल्याणच्या प्रमुख रस्त्यांत नागरिकांची गर्दी होती. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण सज्ज होते. मॉल सजले होते. कुठे नाचगाणी होती, तर कुठे गेम. कोणी केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले, तर कोणी गॅसचे फुगे आकाशात सोडून जल्लोष केला. काही भागांत नव्या वर्षासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पिझ्झा, कॉफी कॅफे, आइस्क्रीम पार्लर, बिर्यानी सेंटर अशी सर्वच दुकाने गर्दीने तुडुंब भरली होती. कुठे तरुणांचे पाय डीजे तालावर थिरकत होते. हॉटेल्समध्येही न्यू ईअर नाइट्ससारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खाडीकिनारे गजबजले होते.
ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या चर्चमध्ये प्रार्थना झाल्या. १२ नंतर बेल्सच्या आवाजानेही परिसरात न्यू ईअरचे चैतन्य निर्माण झाले.
हौजी, संगीतखुर्ची, गाण्यांच्या भेंड्या असे खेळ रंगात आले. खाण्यापिण्याची रेलचेल होती. काही सामाजिक संस्थांनी वर्षभर समाजाचे हित साधता यावे, यासाठी रक्तदान, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. या काळात दुर्घटना होऊ नयेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत पहारा ठेवला होता. (प्रतिनिधी)