पत्रकारितेतील तोफ थंडावली; मान्यवरांनी वाहिली ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:01 AM2019-11-23T03:01:10+5:302019-11-23T03:01:23+5:30

ज्येष्ठ संपादक पद्मश्री नीलकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने मुंबईतील निवासस्थानी निधन

Journalism cannons cooled; Tributes paid tribute to senior editor Neelkanth Khadilkar | पत्रकारितेतील तोफ थंडावली; मान्यवरांनी वाहिली ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली

पत्रकारितेतील तोफ थंडावली; मान्यवरांनी वाहिली ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली

Next

मुंबई : अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ संपादक पद्मश्री नीलकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनवेळा अध्यक्ष होते व विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांनी ३५ पुस्तके लिहिली आहेत.

१९९२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र सरकारतर्फे पत्रकारितेमधील कामगिरीबाबत देण्यात येणारा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. सर्वसामान्यांचा आवाज उठविण्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खाडिलकर यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन नीलकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

ज्येष्ठ पत्रकार व अग्रलेखांचा बादशहा म्हणून जनमानसाचा विश्वास संपादन केलेले ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या निधनाने भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा पत्रकारितेचा कोहिनूर हरपला आहे. खाडिलकर यांची पत्रकारिता प्रखर आणि प्रबोधनकारी होती. त्यांच्या अग्रलेखांची लोकप्रियता भारतीय वृत्तपत्रसृष्टीत नवे विक्रम करणारी होती. सामान्य वाचकांचे त्यांना भरभरून प्रेम लाभले. त्यांच्या लेखणीतून अनेक लेखक आणि पत्रकारांच्या पिढी घडल्या. त्यांच्या निधनाने भारतीय वृत्तपत्रसृष्टीत निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीही भरून निघणार नाही.
- रामदास आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ थंडावली आहे. निळूभाऊ म्हणजे गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज होते. कष्टकऱ्यांचे तारणहार होते. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी विश्वस्त म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य कधीच विसरता येणार नाही. अनेक पत्रकारांना घडविण्याचे काम निळूभाऊंनी केले. अखेरपर्यंत ते पत्रकारितेत सक्रिय होते. यावरून त्यांचे पत्रकारितेवरील प्रेम लक्षात येते.
- नरेंद्र वाबळे, अध्यक्ष,
मुंबई मराठी पत्रकार संघ

नीलकंठ खाडिलकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील तेजस्वी हिरा हरपला आहे. खाडिलकर यांनी आपल्या पत्रकारितेतून निर्भीड, रोखठोक व निष्ठावान पत्रकार म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण केला.
- सचिन अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ

Web Title: Journalism cannons cooled; Tributes paid tribute to senior editor Neelkanth Khadilkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.