इमारतीच्या गच्चीवरुन पडून पत्रकाराचा मृत्यू; अपघात की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 04:18 PM2019-01-06T16:18:54+5:302019-01-06T16:26:24+5:30
मुंबईमधील गोरेगाव परिसरात 49 वर्षांच्या पत्रकाराचा इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडून मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.
मुंबई - मुंबईमधील गोरेगाव परिसरात 49 वर्षांच्या पत्रकाराचा इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडून मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. सिद्धार्थ नगर येथील त्रिमूर्ती सोसायटीतील ही घटना आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श मिश्रा हे त्रिमूर्ती सोसायटीतील सातव्या मजल्यावर राहत होते. नेहमीप्रमाणे रविवारीदेखील मॉर्निग वॉकसाठी ते इमारतीच्या गच्चीवर गेले होते. याचदरम्यान, इमारतीवरुन खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या?, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पोलीस निरीक्षक भोळे यांच्या माहितीनुसार,''मिश्रा ट्रॅक पँट आणि टी शर्ट घालून गच्चीच्या दिशेनं जात असल्याचे इमारती सातव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यावेळेस त्यांच्या हातात रुमालदेखील होता. तर दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये मिश्रा इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडत असल्याचे आढळलंय. ही घटना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पण, मिश्रा खाली कसे पडले?, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही''.
(सातव्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू )
या घटनेनंतर मिश्रा यांनी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये तातडीनं नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिश्रा इमारतीवरुन खाली कसे पडले?, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून त्रिमूर्ती सोसायटी आणि आसपासच्या सोसायटींमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, पोस्टमार्टेमनंतर मिश्रा यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
(बोगस पत्रकार असल्याचे धमकावून कथित पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये)
मिश्रा डीएनए वृत्तपत्राचे Vice President होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात त्यांना 18 वर्षांचा अनुभव होता. मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेस, आनंद बाजार पत्रिका आणि लोकमत ग्रुपमध्ये काम केले होते.