लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांना पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचे १६ जून २०२० रोजी निधन झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या त्यांच्या श्रद्धांजली सभेत, त्यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराला दरवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. त्यानुसार हा प्रथम पुरस्कार आसबे यांना देण्याचे या पुरस्कारासाठी गठित समितीच्या वतीने एकमताने ठरविण्यात आले. २५ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरबीर सिंग, नरेंद्र वाबळे, प्राजक्ता वेळसकर आणि हारीस शेख हे या समितीचे सदस्य असून, डॉ. भालचंद्र मुणगेकर अध्यक्ष आहेत.