‘त्या’ पत्रकाराला अटकपूर्व जामीन; कंगना राणौतच्या बंगल्याबाहेर लोकांना चिथावल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:15 AM2020-10-17T07:15:39+5:302020-10-17T07:16:53+5:30
बंगल्यावर कारवाई सुरू असताना भंडारी यांनी १५-२० लोकांना पैसे देऊन चिथावले, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सांगितले
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिल येथील बंगल्यावर कारवाई सुरू असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल व लोकांना पैसे देऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला सत्र न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांच्यावर खार पोलिसांनी आयपीसी कलम ३५३ (मारहाण करणे), १८८ आणि बॉम्बे पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. आर.एम. सदरानी यांनी भंडारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
बंगल्यावर कारवाई सुरू असताना भंडारी यांनी १५-२० लोकांना पैसे देऊन चिथावले, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सांगितले. त्यानुसार, जमावाने घोषणाबाजीसह पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला, असे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाला सांगितले. तर भंडारी यांच्या वकिलांनी सांगितले की, भंडारी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली नाही. त्यामुळे आयपीसी कलम ३५३ लागू होत नाही. पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून अडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची ताकद लावण्यात आली किंवा मनुष्यबळाचा वापर करण्यात आला, असा उल्लेख एफआयआरमध्ये नाही. पोलिसांची तक्रार गर्दीविरोधात आहे. तसेच घोषणा देण्यासाठी गर्दीला पैसे देणे, हा इथे गुन्हा नाहीच, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने भंडारी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.