पत्रकार जे. डे खूनप्रकरणी छोटा राजनला जन्मठेप, पत्रकार जिग्ना वोरा निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:19 AM2018-05-03T05:19:11+5:302018-05-03T05:19:11+5:30
मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर सडेतोड लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जे. डे यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी सुपारी देऊन खून केल्याबद्दल येथील विशेष
मुंबई : मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर सडेतोड लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जे. डे यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी सुपारी देऊन खून केल्याबद्दल येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने बुधवारी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन आणि त्याचा नेमबाज शूटर सतीश कालिया यांच्यासह एकूण नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अनेक खटल्यांसाठी पोर्तुगालहून भारतात आणलेल्या छोटा राजनला झालेली ही पहिलीच जन्मठेप आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात असलेल्या राजनला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले़ शिक्षा ठोठावल्यानंतर, त्याने ‘ठीक आहे’ प्रतिक्रिया व्यक्त केली.
जिग्ना वोरा व पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका झाली. सिसोदियाला वगळून इतर आरोपींना प्रत्येकी २७ लाख ३५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला़ दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये डे यांची बहीण लीना यांना द्यावेत, असे आदेशही दिले आहेत़ आरोपी विनोद असरानी याचा मृत्यू झाला, तर नयनसिंग बिस्त फरार आहे़
छोटा राजनची कबुली
जे. डे यांच्या खुनानंतर छोटा राजन याने पत्रकारांकडे या गुन्ह्याची कबुली दिल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात नमूद केले होते. त्यात राजन म्हणाला होता, ‘जे. डे. माझ्याविरुद्ध पेपरमध्ये बरेच काही लिहीत होता. मी त्याच्याशी संपर्क साधून, ‘तुझी माझ्याशी काही दुश्मनी आहे का?’ असे त्याला नम्रपणे विचारले होते. त्याने तसे काही नसल्याचे सांगितले, पण माझ्याविरुद्ध लिखाण सुरूच ठेवले. तो बहुधा दाऊद गँगसाठी काम करत असावा, असा माझा समज झाला. खून करण्याआधी मी त्याला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही’
जिग्ना वोराला अश्रू अनावर
पत्रकार जिग्ना वोराने व्यावसायिक वैमनस्यातून जे. डे यांची हत्या करण्यासाठी छोटा राजनला चिथावल्याचा आरोप तपासयंत्रणेने ठेवला. मात्र, तपासयंत्रणा हे सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केली. न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याचे कानावर येताच जिग्ना वोराला अश्रू अनावर झाले़
दि. ११ जून २०११ रोजी जे. डे यांचा खून त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे झाला, असे ‘सीबीआय’चे म्हणणे होते. त्यापैकी ‘कासकरवरील हल्ल्यामागे राजनचा हात होता?’ या शीर्षकाने दिलेल्या बातमीत डे यांनी लिहिले होते, ‘अंडरवर्ल्डच्या कमाईचा जास्तीतजास्त हिस्सा आपल्याला मिळावा, यासाठी निराश झालेल्या व म्हातारा होत असलेल्या राजनने हा गोळीबार केला असावा, असे सूत्रांना वाटते.’
जे. डे यांची पवई येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले़ खटल्यात सरकारी पक्षाने एकूण १५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली़ त्यातील ७ साक्षीदारांना फितूर घोषित करण्यात आले़
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी डे यांची हत्या म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे़ त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
शिक्षा झालेले आरोपी : छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके,
सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगवने आणि दीपक सिसोदिया़