"पत्रकार करतात राष्ट्राच्या जागृतीचे काम"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:13 AM2021-01-07T06:13:49+5:302021-01-07T06:14:35+5:30

Marathi Patrakar Din: राज्यपाल कोश्यारी; पत्रकार दिनानिमित्त संपादक, पत्रकारांचा राजभवन येथे सत्कार

Journalists work for the awareness of the nation : Governor | "पत्रकार करतात राष्ट्राच्या जागृतीचे काम"

"पत्रकार करतात राष्ट्राच्या जागृतीचे काम"

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘जहाँ ना पहुँचे सरकार, वहां पहुँचे पत्रकार...’ अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना काळातील सर्वच प्रसिद्धी माध्यमांतील पत्रकारांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार हा खऱ्या अर्थाने राष्ट्र जागृती करत असतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.


दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन सोहळ्याचे बुधवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार तसेच समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली.
आज देशात, राज्यांत विविध समूहांची वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाहिन्या आहेत. मात्र, देशावर संकट आले की, हे सारे समूह, माध्यमे एकजुटीने काम करतात, याचे उदाहरण कोरोना काळात आपण पाहिल्याचे राज्यपालांनी यावेळी आवर्जून नमूद केले. मराठी वृत्तपत्रांमधील, साहित्यामधील महिलांच्या लेखनशैलीचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. हे सगळे आणखीन खोल समजून घेण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा प्रधानसेवक या नात्याने आपण मराठी शिकत असल्याचेही आवर्जून सांगितले.


या सोहळ्याला दैनिक पुढारीचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्ष सौरभ गाडगीळ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांनी मनोगते व्यक्त केली.
कोरोना काळात निधन झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व महाएनजीओ फेडरेशन या संस्थेने स्वीकारल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.  यावेळी १० विशेष सन्मानही देण्यात आले, ज्यामध्ये महाएनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा, सिनेअभिनेता स्वप्नील जोशी आदींचा समावेश होता.

‘लोकमत’च्या शिरपेचातील 
चार सत्कारमूर्ती

या सोहळ्यात राज्यभरातील १६ पत्रकार, संपादकांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये लोकमत समूहाच्या चौघांचा समावेश असल्याने ही बाब 'लोकमत'साठी अभिमानास्पद ठरली आहे. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लातूरचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे आणि सहाय्यक संपादक पवन देशपांडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

Web Title: Journalists work for the awareness of the nation : Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.