पत्रकार राष्ट्र जागृतीचे काम करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:59+5:302021-01-08T04:15:59+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन पत्रकार दिनानिमित्त संपादक, पत्रकारांचा राजभवन येथे सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जहां ना ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
पत्रकार दिनानिमित्त संपादक, पत्रकारांचा राजभवन येथे सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जहां ना पहुचे सरकार, वहां पहुचे पत्रकार... अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाकाळातील सर्वच प्रसिद्धिमाध्यमांतील पत्रकारांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार हा खऱ्या अर्थाने राष्ट्र जागृती करत असतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन सोहळ्याचे बुधवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार तसेच समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीही या सोहळ्यात प्रदान करण्यात आली.
आज देशात, राज्यांत विविध समूहांची वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाहिन्या आहेत. मात्र, देशावर संकट आले की, हे सारे समूह, माध्यमे एकजुटीने काम करतात, याचे उदाहरण कोरोनाकाळात आपण पाहिल्याचे राज्यपालांनी यावेळी आवर्जून नमूद केले. मराठी वृत्तपत्रांमधील, साहित्यामधील महिलांच्या लेखनशैलीचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले आणि हे सगळे आणखीन खोल समजून घेण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा प्रधानसेवक या नात्याने आपण मराठी शिकत असल्याचेही आवर्जून सांगितले.
या सोहळ्याला दैनिक पुढारीचे अध्यक्ष तसेच उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, दैनिक लोकमत समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक - अध्यक्ष सौरभ गाडगीळ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांनी मनोगते व्यक्त केली.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित या सन्मान सोहळ्यात कोरोनाकाळात निधन झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व महाएनजीओ फेडरेशन या संस्थेने स्वीकारल्याचे जाहीर केले. राज्यपालांच्या हस्ते दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सन्मानित करण्यात आलेल्या राज्यभरातील पत्रकार व संपादक यामध्ये १६ जणांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी १० विशेष सन्मानही देण्यात आले, ज्यामध्ये महाएनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा, सिनेअभिनेता स्वप्नील जोशी आदी मान्यवरांचा समावेश होता.
लोकमतच्या शिरपेचातील तीन सत्कारमूर्ती
या सोहळ्यात ज्या १६ सत्कारमूर्तींचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यामध्ये दैनिक लोकमत समूहाच्या तिघांचा समावेश असल्याने ही बाब लोकमतसाठी अभिमानास्पद ठरली आहे. यामध्ये लोकमतच्या लातूर आवृत्तीचे संपादक धर्मराज हल्लाळे, नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने आणि लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे यांचा समावेश आहे.