मुंबई : भारतीय पत्रकारितेचा साचा हा सुरुवातीपासूनच पितृसत्ताक आहे. त्यामुळे आत्ताची पत्रकारिता अत्यंत जलद गतीने सांप्रदायिक व अंधश्रद्धाळू होत आहे. पत्रकारांनी नेहमी दुसर्यांकडून चांगले शिकायला हवे. तसेच त्यांनी सतत लिहायला हवे. पत्रकाराचे लिखाण त्याला विटेप्रमाणे कडक बनविते. सतत ज्वलंत असणारी लेखणी, निर्भीड आवाज आणि धाडसी निर्णय हाच पत्रकारितेचा भक्कम पाया आहे. त्यामुळे शेवटपर्यंत चांगले काम करत राहा. आणि सतत लिहून तुमची लेखणी बलशाली करा. एक दिवस असा जरूर येईल ज्यावेळेस कोणत्यातरी वाचकाला तुमच्यासारख्या विटांची गरज भासेल. असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी व्यक्त केले. लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या दशकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लाडली या नावात जिद्द असून लाडली पुरस्कार पुरुष पत्रकारांना दिला जातो. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्त्री-पुरुष समानता, महिला हक्क या विषयांवर काम करणारे पत्रकार, नाटक, पुस्तके, चित्रपट यांद्वारे जनजागृती करणाऱ्यांना पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेतर्फे लाडली पुरस्कार देण्यात येतो. मंगळवारी हा सोहळा ऑनलाइन पार पडला.यावेळी शोले चित्रपटातील महिला स्टंट कलाकार रेश्मा पठाण यांना वुमन बिहाईंड द सिन या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या म्हणाल्या की आत्तापर्यंत स्टंटचे पुरस्कार दिग्दर्शकांना मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदाच स्टंट कलाकाराला पुरस्कार मिळाल्याने मी अत्यंत आनंदी झाली आहे. यानंतर ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना लाडली जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या म्हणाल्या की सतराव्या वर्षी संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळेस मला गायक व्हायचे होते. मला असलेली संगीताची आवड जोपासण्यासाठी संगीतकार बनले. या पुरस्काराने माझ्या संगीत क्षेत्राला खऱ्या अर्थाने दाद मिळाली.यावेळी लेखिका लिसा रे यांच्या क्लोज टू द बोन, सोढी सोमेश्वर यांच्या रेडिअन्स ऑफ अ थाऊसंड सन्स, सुप्रीता दास यांच्या फ्री हिट ही पुस्तके पुरस्काराचे मानकरी ठरले. सोनीच्या पटियाला बेब्स मालिकेत मिनीचे पात्र साकारणाऱ्या अशनूर कौर व महाबानू मोदी कोतवाल आणि पुअर बॉक्स प्रोडक्शन यांच्या व्हजायना मोनोलॉग्स नाटकाला पुरस्कार देण्यात आला. एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनच्या मंजुल भारद्वाज यांना वर गीतांजली राव दिग्दर्शित बॉंबे रोझ आणि 'आर्टिकल १५' या हिंदी चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. तर झोया अख्तर यांच्या इंडियन ड्रामा वेब टेलिव्हिजन सिरीझ मेड इन हेवन आणि सोनी चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी लेखन, नाटक, पुस्तके, चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम पद्धतीने कथन केले आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. असे पॉप्युलेशन फर्स्टच्या संचालिका डॉ. ए.एल. शारदा यांनी सांगितले.
पत्रकाराचे लिखाण त्याला विटेप्रमाणे कडक करते- रवीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 1:51 AM