वांद्रे ते वर्सोवा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत! सागरी सेतूचे काम आॅक्टोबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:50 AM2018-09-05T02:50:21+5:302018-09-05T02:50:46+5:30
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येईल. पाच वर्षांत काम पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-वर्सोवा हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल.
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येईल. पाच वर्षांत काम पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-वर्सोवा हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. आधी याच प्रवासाला दोन तास लागत होते, तसेच वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूवर २०५२ पर्यंत टोलवसुली होणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मंगळवारी सांगितले.
वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधकामासाठी रिलायन्स आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात मंगळवारी करार झाला. या वेळी मोपलवार बोलत होते. सात बेटांचे शहर असलेल्या मुंबईत सध्याच्या वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या तीनपट वांद्रे वर्सोवा सागरी सेतूची लांबी असेल. सागरी सेतू उभारल्यानंतर पहिल्या दिवशी सुमारे ६० हजार, तर वर्षाला १० लाख वाहने वर्सोवा सागरी सेतूवरून मार्गस्थ होतील, असा दावा मोपलवार यांनी केला आहे.
मुंबई पालिकेकडून कोस्टल रोड उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे भविष्यात सागरी सेतू-कोस्टल रोड, यामुळे नरिमन पॉइंट ते वर्सोवा हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करणे सहज शक्य होणार असल्याची माहिती मोपलवार यांनी दिली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सुमारे ६० टक्के वाहने या वर्सोवा सागरी सेतूवरून मार्गस्थ होतील. शासनाच्या २००८च्या नियमानुसार, अंतरनुसार टोलवसुली होईल. २०५२ पर्यंत कंत्राटदाराला टोलवसुलीची मुभा आहे. संबंधित कंत्राटदाराने डेडलाइनच्या ६ महिने आधी काम पूर्ण केल्यास ३५० कोटी बोनस म्हणून देण्यात येतील, असे मोपलवार यांनी स्पष्ट केले.
सागरी सेतूवरून वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा जोडरस्ता असेल. या रस्त्यांवर टोलवसुली होईल, असे एमएसआरडीसीने सांगितले.
लांबी १७.१७ किलोमीटर
सागरी सेतूची लांबी १७.१७ किमी असून, यात मुख्य सेतू ९.६० किमी आणि वांद्रे रस्ता-कार्टर रोड-जुहू कोळीवाडा यांचे एकत्रित अंतर ७.५७ किमी असेल. सागरी सेतूवरून वांद्रे, कार्टर रोड जोडरस्ता आणि जुहू कोळीवाडा जोडरस्ता असेल.