फाईलचा प्रवास संपला स्मशानात; वेतन मिळत नसल्याने विष प्राशन करणाऱ्या कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 09:42 AM2021-12-25T09:42:56+5:302021-12-25T09:43:29+5:30
गेली दोन वर्षे तो मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून पालिकेच्या पी दक्षिण कार्यलयात हेलपाटे घालत होता.
गौरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेली दोन वर्षे तो मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून पालिकेच्या पी दक्षिण कार्यलयात हेलपाटे घालत होता. अनेक दिवस उपाशी राहिल्यावर भीक मागून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली. आई बाप नव्हते आणि आजारी भावाची जबाबदारी त्याच्यावर होती. पगाराची विचारणा केल्यावर ‘अजून तुमची फाईल आलेली नाही’ हे एक उत्तर त्याला दिले जायचे. अखेर तो कंटाळला आणि कार्यालयातच त्याने विष प्राशन केले. आधी ट्रामा केअर आणि नंतर केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला आणि पगाराच्या अडकलेल्या फाईलचा प्रवास अखेर स्मशानात संपला.
जोगेश्वरीत राहणाऱ्या रमेश परमार यांना ९ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचे वडील जगदीश यांच्या जागी वारसा हक्क धोरणांतर्गत सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या वडिलांचा २०१९ सालच्या पुरामध्ये कामावर असतानाच मॅनहोलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. रमेश हे दोन्ही हाताने दिव्यांग होते. त्यांचे काका पीतांबर परमार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, रमेश यांना एक भाऊ असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यांच्या वडिलांच्या विविध दावे रकमेपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
परमार यांचा पगार अडकविल्याने उपाशी राहण्याची, कर्ज काढण्याची आणि भीक मागून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे यापुढे अशा प्रकारांवर आळा बसेल या दृष्टीने पालिकेने पावले उचलावीत. तसेच विविध खात्यांतील सेवानिवृत्त, मृत आणि वैद्यकीयदृष्टीने अपात्र कामगारांचे विविध दावे, तसेच नोकरी प्रकरण तत्परतेने निकालात काढावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आली. या आंदोलनात पी दक्षिणसह, के पश्चिम आणि जी उत्तरच्या कामगारांनी हजेरी लावली. त्यांचे नेतृत्व अध्यक्ष अशोक जाधव, मंगेश पेडामकर आदींनी केले.
भावाला मदत आणि नोकरी
‘मृत रमेश यांचा लहान भाऊ कल्पेश परमार (२२) याला त्यांच्या जागी सफाई कर्मचारी म्हणून सेवेत घेतले जाणार आहे. तसेच त्याला एक लाख रुपये आर्थिक मदत म्हणूनही देणार असल्याचे युनियन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. धोंडे यांनीदेखील याप्रकरणी जमेल ती मदत करण्याचे आश्वासन युनियनच्या शिष्टमंडळाला दिले.
रमेशला काम करूनही पगार दिला जात नव्हता. जवळपास दोन वर्षे हाच प्रकार सुरू होता. त्यामुळे दुसऱ्याकडे मागून खावे लागते होते. तसेच काही प्रमाणात झालेल्या कर्जामुळे रमेशची प्रकृती आणि मानसिक स्थिती ढासळत होती. मात्र, हेड ऑफिसची फाईल अखेरपर्यंत काही आली नाही आणि विष पिऊन माझ्या पुतण्याने आत्महत्या केली. केईएम रुग्णालयात त्याने गुरुवारी रात्री प्राण सोडले आणि शुक्रवारी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. या सगळ्याला कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून परत एखादा रमेशसारखा कोणाचा बळी जाणार नाही. - पीतांबर परमार, रमेश परमार यांचे काका