Join us

प्रवास तो सृजनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:07 AM

- डॉ. पल्लवी नाईकलॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरी बसून होते. रिकामा वेळ कसा घालवायचा म्हणून अनेकांनी आपल्या अंगी असलेली ...

- डॉ. पल्लवी नाईक

लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरी बसून होते. रिकामा वेळ कसा घालवायचा म्हणून अनेकांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासायला सुरुवात केली. ज्यांना या काळात नैराश्य आले होते, त्यांना या कलेने मात्र आधार दिला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २९ एप्रिलला जागतिक नृत्य दिन आहे. त्यानिमित्ताने या कलेतून मिळणाऱ्या आनंदाविषयी...

...........................................

‘संगीतातील सप्त स्वरांना

रेखाटले शरीराच्या डौलाने,

अभिव्यक्त झाल्या भावना

अंतरंगातील प्रसन्नतेने’

नृत्य - गीत, वाद्य व ताल या त्रिसुत्रीतून मन, शरीर आणि बुद्धी या त्रिमितींवर नकळत संस्कार करणारी एक अलौकिक कला. मनाला आनंद देणारी, शरीराला फिट ठेवणारी, आध्यात्मिक समाधान देणारी ही कला म्हणजे दृक्श्राव्य काव्यच.

या कलेचे अनेक पैलू आहेत. त्यातील काही नृत्य शिक्षण, रियाज आणि सादरीकरण. हे पैलू वेगवेगळे असले तरीही यातील एक महत्त्वाचे साम्य म्हणजे या तिन्हींतही लागणारी मन, शरीर आणि बुद्धीची एकाग्रता. नृत्य वर्गातील शिक्षण असो, स्वतःचा रियाज असो किंवा सादरीकरण असो, आपण जेव्हा नृत्य करतो तेव्हा ते नृत्य आपण का करतो यापेक्षा ते नृत्य आपण कसे करतो, याकडे लक्ष दिले तर नृत्यातून कायमच आनंद मिळतो.

सध्याच्या परिस्थितीमुळे नृत्य शिक्षकांनीही ऑनलाईन नृत्यवर्ग घेण्याचा पर्याय अगदी सहजपणे अवलंबला आहे. ऑनलाईन नृत्यवर्गांमुळे नृत्य अभ्यास तर चालू राहतोच पण रोजच्या वैयक्तिक रियाजला प्रेरणा मिळते, शारीरिक बळ वाढते व मानसिक समाधान प्राप्त होते.

ऑनलाईन वगळता ही कला रसिकांसमोर सादर करण्यात मर्यादा तर आहेतच, पण जर कलाकार कलेसारखाच प्रवाही नाही राहिला आणि काळानुसार स्वत:मध्ये अपेक्षित बदल नाही घडवले तर कलेतील व कलाकारातील चैतन्य हरवून जाईल, म्हणूनच ऑनलाईन सादरीकरणाच्या पर्यायाचे कलाक्षेत्रात स्वागत झाले.

शास्त्रीय कलेचे सौंदर्य अधिक खुलते प्रयोगात

दृकश्राव्य जाणिवेतून मनास अनुभवते रसास्वाद

रंगमंचावरील प्रयोगशील कला नटेशाचे देणे

प्रेक्षकांच्या साक्षीने मनाचा मनाशी संवाद इथे होणे

पण….

रंगमंच बंद, तरी कलाकृती घडत आहे. कलाकाराच्या उर्मीला फेसबुक लाईव्हची साथ आहे. मनाशी मनाचा संवाद जरी आभास तरीही संवेदनशील आहे. रसिकांच्या टाळ्यांसाठी कॉमेंट बॉक्स ही सज्ज आहे. मर्यादा नाही प्रेक्षकांची, प्रेक्षागृह आपलेच आहे. स्वदेशीजनांबरोबर परदेशस्थित आप्तजनांनाही आमंत्रण आहे.

असा हा ऑनलाईन प्रयोग नृत्यकलेचा

प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे नेणाऱ्या कलाविष्कारात रमून जायचा. या ऑनलाईन नृत्य सादरीकरणातून नृत्य कलाकारांनाही अनेक गोष्टी अनुभवता आल्या, कमीतकमी सोयी-सुविधांमध्ये अधिक प्रभावी सादरीकरण करण्याचे कसब कलाकारांना आपोआपच अवगत झाले, अमर्याद प्रेक्षकांसमोर आपली कला सादरीकरणाचे समाधान अनुभवता आले. नृत्यासारखी सौंदर्यपूर्ण चल व प्रवाही कला, युगोनयुग आत्मानंद देत आली आहे आणि आजच्या काळातही तंत्रज्ञानाच्या विविध आभूषणांनी नटून जनमानसाचे मनोरंजन करायला सज्ज, रसानंदाचे उद्दिष्ट साध्य कारण्यास तत्पर आहे. चैतन्यमय राहण्यासाठी या कलेला केवळ आपल्या सकारात्मक विचारांची व सृजनतेची जोड अपेक्षित आहे.

मुखाने गीत गावे, हस्तांनी अर्थ प्रकट करावा, डोळ्यांनी भाव व्यक्त करावा आणि पायांनी ताल, ठेका धरावा, यालाच तर नृत्य म्हणतात.

नृत्य करताकरता नर्तकी जेव्हा गीत, भाव, अभिनय व तालात मग्न होते तेव्हा ती नृत्यकलेच्या एक वेगळ्या विश्वात समरस होते आणि स्वाभाविकच तिला आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडतो, ध्यानावस्था यापेक्षा वेगळी काय बरं असते!

आपल्या भारतीयांकडे तर ६४ कलांचा अमूल्य ठेवा आहे. मग आपण तर आजच्या परिस्थितीला अधिक दृढतेनं सामोरे जायला हवे. आज जेव्हा दैनंदिन व्यवहार बंद आहेत, तेव्हा आपल्या सगळ्यांनाच कलेचे महत्त्व पटले आहे. कारण

कलेच्या अभ्यासात मन रमते खूप छान

अवतीभवतीच्या विश्वाचे न उरे किंचितही भान

विचारांमधील सुख-दु:खांना इथेच मिळे विश्राम

नवनिर्मितीच्या श्रमांचा होय इथे सन्मान

कला आणि कलाकृती

स्फुरण असे कल्पनांचे

सौंदर्याच्या अनुभवाचे

माध्यम ते कलाकाराचे

प्रवास तो सृजनाचा

शोध असे रसानंदाचा

शरीर,मन, बुद्धीच्या एकोप्याने

पूर्णत्वास जाण्याचा

अशी कला मला वाटते आज जीवनदायिनी झाली आहे.

(लेखिका कलाप्रांगण ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त आहेत.)

(शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे)