Join us  

उपचार ते शिक्षणापर्यंत माणुसकीचा प्रवास

By admin | Published: June 19, 2014 2:05 AM

दोन वर्षांपूर्वी अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती सुधारू लागली आहे. डॉ. डी. वाय. पाटील समूहाने उपचारासह आता सदर महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलली आहे

नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती सुधारू लागली आहे. डॉ. डी. वाय. पाटील समूहाने उपचारासह आता सदर महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलली आहे. यामुळे दोन वर्षांपासून रूग्णालयातच मुक्कामास असलेली ही मुलगी आता शाळेत जावू जागली आहे. नेरूळमध्ये राहणाऱ्या माबीया मंडल या महिलेच्या चेहऱ्यावर सप्टेंबर २०१२ मध्ये तिच्या पतीने अ‍ॅसिड टाकले होते. या हल्ल्यात तिचा पूर्ण चेहरा जळून गेला. डोळेही निकामी झाले. काही दिवस महापालिका रूग्णालयात उपचार केल्यानंतर तिला डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात हलविण्यात आले. तिची घरची स्थिती बेताची असल्यामुळे रूग्णालय व्यवस्थापनाने तिच्यावर मोफत उपचार सुरू केले. डॉक्टर, समाजसेवा अधिकाऱ्यांनी मदत एकत्र करून औषध व इतर खर्च करण्यास सुरवात केली. पीडित महिलेची मुलगी अनिशा मंडल हिच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली. काही दिवस पालकांचीही रूग्णालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन वर्षांपासून मिशन म्हणून सदर महिलेवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तिच्यावर १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आता तिच्या डोळ्यांचे पुनर्रोपण करण्याची शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. सदर महिलेवर उपचार सुरू असताना तिची मुलगी आता पाच वर्षांची झाली. तिच्या शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डॉक्टरांनी रूग्णालयातच शिकवणी सुरू केली. रूग्णांच्या मुलांसाठी मोफत शिकवणीवर्ग सुरू केले. परंतु हे प्रयत्न पुरेसे नव्हते. मुलीच्या भवितव्याचा विचार करून अखेर रूग्णालय व्यवस्थापनानेच तिला नेरूळमधील पुणे विद्या भवन या नामांकित शाळेत दाखल केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख विजय पाटील यांनी तिच्या नर्सरी ते पदवीपर्यंतच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपचार ते मुलीच्या शिक्षणापर्यंतचा माणुसकीचा प्रवास पाहून पीडित मुलीच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)