मुंबई : कांजूर मार्ग ते शीळफाटा दरम्यानचा प्रवास आता अर्ध्या तासात पूर्ण करता येणार आहे. या मार्गातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बोगदा (टनेल) बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यासह एमएमआरडीएनेमेट्रो चार मार्गिकेच्या कारशेडची जागाही बदलली आहे. यामुळे कारशेडसाठी निवडण्यात आलेल्या जागेवरील झाडे वाचणार आहेत, तसेच येथील विविध वाहतूक प्रकल्पांमुळे कांजूर मार्ग ते शीळ फाटा दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. यामुळे या मार्गे प्रवास करताना प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कांजूर मार्ग ते शीळ फाटा दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना बऱ्याचदा वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल एक तास किंवा कधी-कधी त्याहून जास्त वेळ लागतो. मात्र, आता एमएमआरडीएने कांजूर मार्ग ते शीळ फाटा दरम्यान १.८ किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण होताच, या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करता येणार आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
यासह या मार्गाजवळून स्वामी समर्थनगर- जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो सहा मार्गिकेचा मार्ग जातो. या मेट्रो मार्गिकेच्या कामालाही सुरुवात झाली आहे. यामुळे मेट्रो-६ मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गिकेने ओशिवरा ते भांडुप आणि तेथून शीळ फाटापर्यंत जाणे सहज शक्य होणार आहे. यामुळे ओशिवरा ते शीळ फाटा हे अंतर मेट्रो मार्गाने अवघ्या तासात पूर्ण करता येणार आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दोन तासांहून अधिक वेळ लागत आहे. वाहतूककोंडीत अडकल्यास आणखीनच वेळ वाया जातो. त्यामुळे मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे.मेट्रोमुळे प्रवास होणार जलदकांजूर मार्ग ते बदलापूर असा मेट्रोचा मार्गदेखील याच ठिकाणाहून प्रस्तावित असून, हा मेट्रोमार्ग शीळ फाटामार्गे जाईल. या मेट्रो मार्गामुळे प्रवास जलद होऊन बदलापूर ते शीळफाटा हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटांवर येईल. ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर ओशिवरा ते कांजूर मार्ग आणि कांजूर मार्ग ते बदलापूर व्हाया शीळ फाटा असे अंतर एक ते सव्वा तासात प्रवाशांना पार करता येणार आहे.