जीवनवाहिनीचा प्रवास जिकिरीचाच
By admin | Published: July 11, 2016 03:51 AM2016-07-11T03:51:47+5:302016-07-11T03:51:47+5:30
काही वर्षांपूर्वी मुंबईची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण हे फारच कमी होते. वाढलेल्या लोकल व फेऱ्या, प्रवासी संख्या आणि त्याचबरोबर वाढत गेलेल्या सुविधा यामुळे
सुशांत मोरे , मुंबई
काही वर्षांपूर्वी मुंबईची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण हे फारच कमी होते. वाढलेल्या लोकल व फेऱ्या, प्रवासी संख्या आणि त्याचबरोबर वाढत गेलेल्या सुविधा यामुळे उपनगरीय रेल्वेवर बराच ताण वाढत गेला. रेल्वेचा आवाका मोठा आणि कमी मनुष्यबळ यामुळे देखभाल-दुरुस्ती तसेच सुरक्षा याकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले. त्याचाच फटका गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या लोकल सेवेला बसत गेला.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत अनेक कारणांनी लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी अक्षरश: ‘मरणयातना’ भोगल्या. या चार महिन्यांत मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर व पश्चिम रेल्वेवरील १४ घटनांमध्ये तब्बल ६८७ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचे समोर आले आहे. तर शेकडो लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागलेला आहे. ओव्हरहेड वायर, पेन्टाग्राफ, लोकल आणि सिग्नलमधील बिघाडाबरोबरच लोकल तसेच एक्स्प्रेसचे इंजीन रुळावरून घसरल्याच्या घटना त्यास कारणीभूत ठरल्या. तर काही लोकल व सिग्नलमधील बिघाडांच्या घटनांना बॅटरी व केबल चोरीही कारणीभूत ठरल्या आहेत. सुरक्षा व देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वेकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळेच दुर्लक्ष होत असून, त्याचाच मोठा फटका बसत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांकडूनही रेल्वे प्रवासी तसेच मालमत्तांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचे सांगण्यात आले होते. हे मनुष्यबळ वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाडांच्या घटना पूर्णपणे थांबण्याचे कमी होताना दिसत नाही. रेल्वे रुळावरून घसरणे, पेन्टाग्राफ किंवा ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होणे, केबल किंवा बॅटरी चोरीमुळे सिग्नलमध्ये बिघाड तसेच लोकलमध्ये बिघाड होणे ही आता रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने सामान्य गोष्ट झाली आहे. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि रेल्वे पोलिसांकडून सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष व समन्वयाचा अभाव असल्यानेच लोकल सेवा विस्कळीत होण्याचे ते प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे याकडे रेल्वेमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांची वाढत जाणारी संख्या पाहता मुंबई पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी बनवून अन्य वाहतूक पर्यायांवर विचार केला जावा.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद
दिवसेंदिवस लोकल सेवा विस्कळीत होत असल्याचा मनस्ताप प्रवाशांना होत आहे. रेल्वे मालमत्तेची चोरी होते आणि रेल्वे सेवा विस्कळीत होते. रेल्वे पोलिसांकडून जरी याकडे लक्ष दिले जात असले तरी त्यांच्या मनुष्यबळाचाही विचार रेल्वे प्रशासनाने करायला हवा. त्यात रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देऊन मनुष्यबळ कसे वाढवता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे. आपली जबाबदारी नाही असे म्हणून जबाबदारी झटकणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना त्रास होत आहे. रेल्वेमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. सुरक्षा आणि देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न बराच भेडसावत असून, प्रशासनाची जरब राहिलेली नाही.
- लता अरगडे, उपाध्यक्ष,
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
पश्चिम रेल्वेवर होणाऱ्या घटना पाहिल्यास त्या वेगवेगळ्या आहेत. आमच्याकडून सुरक्षा व देखभाल-दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले जात असल्यानेच चोरी आणि तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण हे फार कमी आहे. रेल्वे पोलिसांकडून ट्रॅकवर गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच ट्रॅकजवळील झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृतीही केली जात आहे. जेणेकरून केबल चोरी किंवा सिग्नलच्या केबल किंवा अन्य यंत्रणांना आगी लागू नयेत. आता तर आम्ही रेल्वेच्या काही महत्त्वाच्या मालमत्तांजवळ सीसीटीव्ही आणि अलार्म यंत्रणाही बसवणार आहोत.
- रवींद्र भाकर,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
रेल्वेमंत्र्यांकडून दखल घेऊनही फायदा नाही
६ जून २0१६
पहिल्या आठवड्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सूचनांनुसार रेल्वे बोर्ड सदस्य गिरीश पिल्लई यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेवर झालेल्या बिघाडांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत धाडले. त्याचा आढावा घेत त्यांनी अनेक सूचना रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिसांना केल्या. मात्र त्यानंतरही काहीएक सुधारणा झाल्या नाहीत.
२३ जून २0१६
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई लोकलचा वक्तशीरपणा सुधारत नसल्याचे पाहून महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेतली आणि वेळापत्रक सुधारणेच्या सूचना केल्या. तसेच रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अनेक सूचना त्यांच्याकडून करण्यात आल्या.
प्रवाशांचे होणारे हाल कधी थांबणार, असा प्रश्न लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांकडून आता उपस्थित केला जात आहे. सातत्याने मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. रेल्वेमंत्र्यांनी अनेक वेळा रेल्वे बोर्डाच्या सदस्यांना पाठवून सेवा विस्कळीत होण्याचा आढावा घेतला. मात्र पुन्हा जैसे थेच परिस्थिती आहे. सोयीसुविधांच्या नावाने बोंब असतानाच निदान वेळेवर लोकल धावतील अशी अपेक्षा प्रवाशांची आहे. परंतु तसेही होताना दिसत नाही.
- नंदकुमार देशमुख, संघटक, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
एप्रिल ते जुलै दरम्यान लोकल विस्कळीत होण्याच्या घटना
४ एप्रिल- रबाळे स्थानकाजवळ सकाळच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. तब्बल तीन तास खोळंबा. ५0 पेक्षा लोकल फेऱ्या रद्द.
११ एप्रिल- कांदिवलीजवळ बोरीवली-चर्चगेट लोकलचा पेन्टाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. ६0 लोकल फेऱ्या रद्द.
२४ एप्रिल- बोरीवलीजवळ एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड.
२४ मे- वान्द्रे स्थानकाजवळ एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकली. हार्बरचा बोऱ्या.२६ मे- विक्रोळी येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या आॅक्झिलरी ट्रान्सफॉर्मर यंत्रणेत बिघाड, १00 पेक्षा लोकल रद्द. सर्वात मोठा बिघाड
३१ मे - लोअर परेल जवळ लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला. १00 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द.
१ जून - हार्बरवर रावळी जक्शनजवळ सिग्नल बिघाड-
७ जून- सीएसटी ते कांजुरमार्ग दरम्यान ओव्हरहेड वायरचा विद्युतप्रवाह कमी जास्त होत होता.
२१ जून - मेन लाईनवर तीन घटनांमुळे २५३ लोकल फेऱ्या रद्द.
३ जून - सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये बिघाड. दादर स्थानकातील घटना.
२८ जून-अंबरनाथहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड. २९ जून- ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प, ५४ फेऱ्या रद्द.
४ जुलै- एका मालडब्याचे अकरा डबे डहाणू स्थानकाजवळ घसरले. २९ पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द. विरार ते डहाणू दरम्यानच्या लोकल सेवांवर परिणाम.
७ जुलै- उद्यान एक्सप्रेसचे इंजिन मस्जिद स्थानकाजवळ घटना- ७0 लोकल फेऱ्या रद्द, अनेक लोकल फेऱ्यांना लेटमार्क.