Join us  

मोनोचा प्रवास ‘स्लो’ ट्रॅकवरच

By admin | Published: July 28, 2014 2:12 AM

प्रथम मुंबईकरांच्या सेवेत आलेल्या मोनो रेल्वेचा उत्पन्न मिळवण्याचा प्रवास खूपच धीमा सुरू आहे.

सुशांत मोरे मुंबईप्रथम मुंबईकरांच्या सेवेत आलेल्या मोनो रेल्वेचा उत्पन्न मिळवण्याचा प्रवास खूपच धीमा सुरू आहे. आताच्या पहिल्या टप्प्यात प्रवासी आणि उत्पन्नाची बोंब असल्याने मोनो रेल्वेच्या पुढील टप्प्यावर वाढीव प्रवासी आणि उत्पन्न असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येते. गेल्या पाच महिन्यांत २0 लाख २४ हजार ९२९ प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून फक्त १ कोटी ४९ लाख १७ हजार ७७८ रुपये उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोच्या तुलनेत प्रवासी आणि उत्पन्नाचा प्रवास स्लो ट्रॅकवर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चेंबूर ते वडाळा अशी मोनो रेल्वे सेवा फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत आली. ही सेवा सुरू होताच सुरुवातीच्या दिवसांत उत्साही प्रवाशांकडून त्याला प्रतिसाद मिळाला. मात्र चेंबूर आणि वडाळा रेल्वे स्थानकापासूनच मोनो रेल्वे लांब असल्याने अनेकांना या ठिकाणी जाताना आॅटो किंवा टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे खिशाला मोठी कात्री लागते. अशा अनेक कारणांमुळे मोनोमुळे मुंबईकरांचा प्रवास दिलासा देणारा होण्यापेक्षा खूप कटकटीचा झाल्याचे दिसून आले. ८ जून रोजी मेट्रो सुरू होताच रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २ लाख ४0 हजार एवढी होती. हाच आकडा वाढून ३ लाख आणि त्यानंतर ५ लाख एवढा झाला. एका महिन्यात तब्बल कोटी प्रवाशांनी प्रवास केला. मात्र त्यामानाने मोनोचा प्रवास खूपच धीम्या असल्याचे दिसून येते. हे पाहता मोनो रेल्वेचे पुढील टप्पे झाल्यास त्यानंतरच प्रवासी आणि उत्पन्न वाढेल आणि मोनो फायद्यात येईल, अशी आशा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.