मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास होणार अवघ्या वीस मिनिटांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 06:16 AM2019-10-19T06:16:29+5:302019-10-19T06:16:38+5:30

Mumbai Trans Harbor Link Project : शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्प : ताशी १०० किमी वेगाने धावणार वाहने

The journey from Mumbai to Navi Mumbai will be in about 20 minutes | मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास होणार अवघ्या वीस मिनिटांमध्ये

मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास होणार अवघ्या वीस मिनिटांमध्ये

Next

मुंबई : शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या (एमटीएचएल) कामाला आता गती आली आहे. ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली झाल्यावर या मार्गिकेवर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सांगण्यात आले. यामुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये थेट २० ते २५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.


मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी शिवडी ते न्हावाशेवा या मार्गावर २२ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांमध्ये करण्यात येत असून या तीनही टप्प्यांमध्ये २,२०० पिलर समुद्री मार्गामध्ये उभारण्यात येणार आहेत. यापैकी आत्तापर्यंत ४४० पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावर सहा मार्गिका असणार असून एक अतिरिक्त मार्गिका पुलाच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात येणार आहे. सध्या शिवडी ते न्हावा शेवा असा प्रवास करण्यासाठी तब्बल एक तास आणि त्याहून अधिक वेळ लागतो. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर फक्त २० ते २५ मिनिटांचा अवधी लागणार असल्याने ४० मिनिटांची आणि त्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे.


सध्या या प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम वेळेमध्ये पूर्ण व्हावे म्हणून या मार्गावर जिओ टेक्निकल सर्वेक्षणही करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणासह अन्य विभागांचीही परवानगी मिळाली आहे. २२ किमी मार्गिकेचा १६.६ किमीचा भाग समुद्रामध्ये असणार आहे, तर ५.५ किमी लांबीचा भाग हा जमिनीवर असणार आहे. समुद्रामध्ये बांधण्यात येत असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी समुद्रामध्ये २५ ते ३० मीटर खाली खोदकाम करून पिलर उभारण्यात आले आहेत. या कामांचा समुद्रातील जलसंपत्ती आणि जलचरांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. यासाठी पाण्यामध्ये खोदकाम करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून रिवर सर्कुरल मशीनचा वापर करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Web Title: The journey from Mumbai to Navi Mumbai will be in about 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.