मुंबई : लांबलचक रांगांमध्ये बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभ्या राहणाऱ्या बेस्टच्या प्रवाशांची ओढाताण मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम होती. गर्दीच्या वेळेत गाड्या थांब्यावर उभ्या राहत नसल्याने बऱ्याच जणांना रिक्षा-टॅक्सीचा आधार घेऊन कार्यालय गाठावे लागले.
कार्यालयात जाताना आणि तिथून परततानाचा प्रवास नोकरदारांसाठी कसोटीचा ठरला. आगारात जाऊन बस पकडल्यास सीट मिळते; पण मधल्या स्टॉपवर गाडी थांबवली जात नसल्याचे चित्र मंगळवारीही पाहावयास मिळाले. याबाबत बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही सूचना चालक-वाहकांना दिल्या नसल्याचे सांगण्यात आले. नियमानुसार प्रत्येक थांब्यावर गाडी उभी करणे बंधनकारक आहे. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन वर्दळीच्या भागांत फेऱ्या वाढवल्या असून, प्रवासी कमी असलेल्या मार्गावरील अतिरिक्त फेऱ्याही या मार्गांवर वळविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
काही चालक-वाहकांनी मात्र प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टने काढलेल्या परिपत्रकानुसार आसनक्षमतेहून अधिक प्रवाशांना प्रवेश देण्यास मनाई आहे. पहिल्याच स्टॉपवर बस भरली की, इतर थांब्यांवरील प्रवाशांना बसवायचे कुठे, असा सवाल त्यांनी केला. उभ्याने प्रवासास परवानगी नाही. मात्र, गाडी स्टॉपवर उभी केली की, प्रवासी धक्के देत चढतात. कोणत्याही सूचना ऐकण्याच्या मन:स्थितीत ते नसतात. बरेच जण थेट भांडण सुरू करतात. त्यामुळे गाडी भरली की, आम्ही मधल्या थांब्यावर थांबत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
* दरराेज किती गाड्या धावतात?
बेस्ट बस - ३०९४
एसटी - २५०
प्रवासी - १८ लाख १३ हजार
(७ जूनची आकडेवारी)
* तक्रार दाखल केल्यास हाेणार कारवाई
परिवहन विभागाच्या नियमानुसार प्रत्येक थांब्यावर बेस्ट बस उभी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणावेळी प्रत्येक चालक आणि वाहकाला हा नियम समजावला जातो. त्यामुळे नव्याने तशा सूचना देण्याची गरज नाही. थांब्यावर बस उभी न केल्याची रीतसर तक्रार एखाद्या प्रवाशाने दाखल केल्यास पुढील कारवाई केली जाईल.
- एम.एस. वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट
* लोकल सुरू झाल्याशिवाय स्थितीत सुधारणा नाही
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी लोकलचा त्यात समावेश नाही. त्यामुळे बेस्टवर अतिरिक्त ताण आहे. मात्र, मुंबईचा भार वाहायला बेस्टची वहनक्षमता अपुरी असल्याने लोकल सुरू झाल्याशिवाय स्थितीत सुधारणा होणार नाही, असे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले.
-----------------------------------------