मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या मार्गावरील शिवनेरी सेतूवरून धावत असून, या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
एसटी महामंडळाकडून मंगळवारपासून सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अटल सेतूवरून शिवनेरी धावत असल्याने प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होत आहे. या सेवेच्या फेऱ्या वाढल्या की, या बसमधून प्रवाशांची संख्याही वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी दोन्ही शिवनेरीतून १०७ प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला ३७ हजार ३७५ रुपयांचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई ते नवी मुंबईसाठी अटल सेतूवरून आता प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अवजड वाहनांसह कारचालकांनी या सेतूला पसंती दिली आहे.