लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिका वा राज्य शासन लसींच्या साठ्याकरिता केंद्राकडे मागणी करते. याखेरीज, स्वतंत्रपणेही लसींचा साठा खरेदी केला जातोय. तसेच खासगी रुग्णालय वा संस्थांनाही स्वतंत्रपणे लसींचे डोस खरेदी करण्याचे अधिकार आहेत. या साठ्याच्या मागणीनंतर कोविशिल्डचा सीरम संस्थेतून साठा पुरविण्यात येतो, कोव्हॅक्सिनचा साठा हैदराबाद तर स्पुतनिकचा साठा करण्यात येतो आहे. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मिळणाऱ्या साठ्यातील ७० टक्के साठा हा दुसऱ्या डोसकरिता राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
दररोज दोन लाख डोस देण्याची क्षमता
मुंबई महापालिकेला दररोज लसीचा आवश्यक साठा वेळेत उपलब्ध झाल्यास लसीकरण प्रक्रियेला वेग येईल. दररोज दोन लाख डोसची क्षमता आहे. मुंबईत पालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६३ लाख ४० हजार जणांना पहिला, तर २१ लाख ६० हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ८५ लाख डोस देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
कोव्हॅक्सिनला वाढती मागणी
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मागणी वाढली असून लसीच्या शोधात मुंबईतील अनेक लाभार्थी ठरावीक लसीकरण केंद्राचा शोध घेत आहेत. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) निर्मिती केलेली ‘कोव्हॅक्सिन’ ही पहिली स्वदेशी लस मुंबईत जे.जे. रुग्णालयात तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याअंतर्गत १६ जानेवारीपासून द्यायला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ५० हजार १७४ लाभार्थ्यांनी ही लस घेतली आहे. त्यात ४ लाख १८ हजार २८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार १४६ इतकी आहे.
लसींचा साठा नियमित व्हावा यासाठी प्रयत्न
देशभर खासगी आरोग्य संस्थांनी खरेदी केलेल्या लस मात्रांपैकी सर्वाधिक, सुमारे २४ टक्के साठा महाराष्ट्रातील कंपन्यांनी खरेदी केला असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. केंद्राने नव्या लसीकरण धोरणानुसार एकूण लस उत्पादनापैकी लसींच्या साठ्यातील ५० टक्क्य़ांऐवजी २५ टक्के साठा खासगी आरोग्य संस्थांना खुला केला. त्याच वेळी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी मोफत लसपुरवठा करण्याचे धोरणही जाहीर केले. परिणामी सरकारी रुग्णालयांतील लसीकरणाकडे कल वाढला असून जुलैपासून खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचा प्रतिसाद कमी झाला. मात्र, शासकीय रुग्णालयांना होणारा लसींचा पुरवठा अनियमित आहे, तर खासगी रुग्णालये लस मात्रांची साठेबाजी करत असल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने स्वयंसेवी, सामाजिक संस्थांसह वंचित दुर्बल घटकातील नागरिकांना लस देण्यासाठी खासगी संस्थांसोबत करार केला.