- पूजा दामले, मुंबईलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या गिरगावातील दोन मंडळे यंदा शतकोत्सव साजरा करत आहेत. तर शहरातील अनेक मंडळांनी सुवर्ण, हीरक, अमृत महोत्सवात पदार्पण केले आहे. यामुळे यंदा मुंबापुरीत मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज होते आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वच ठिकाणी लगबग दिसून येत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीपासूनच शहरात जल्लोष द्विगुणित झाला आहे. गिरगाव, लालबाग-परळ या विभागांच्या बरोबरीनेच शहरातील अनेक ठिकाणी गणेशोत्सवात भक्तगण गर्दी करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दहाही दिवस मंगलमय वातावरण, जल्लोष, उत्साह पाहायला मिळतो. यंदा हा आनंद द्विगुणित होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची रौप्य, हीरक, सुवर्ण आणि शतकोत्सवाकडे होणारी वाटचाल. आपल्या बाप्पासाठी सर्वच जण तन्मयतेने काम करत असतात. पण दीर्घकाळ चालत आलेली परंपरा टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी मंडळे विशेष तयारी करत आहेत. गिरगावातील आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ग्रॅण्ट रोड येथील शास्त्री हॉलमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शतकोत्सव साजरा करत आहेत. १०० वर्षांपूर्वी सुरू झालेले हे गणेशोत्सव एकही वर्ष खंड पडू न देता साजरे होत आहेत. दरवर्षी साध्या पद्धतीने साजरे झाले तरीही १०० व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी एक वेगळा उत्साह, जोश गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. याच विभागातील इतर काही मंडळांनी रौप्य, सुवर्ण वर्षांमध्ये पदार्पण केलेले आहे. यामुळे या मंडळातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात कार्यरत आहेत. सर्वच मंडळांची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. परमानंदवाडी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ७५ वे वर्ष आहे. यामुळे यंदा त्यांनी पुन्हा एकदा मोठा देखावा उभा केला आहे. सागरी जीवनमानावर यंदा त्यांनी देखावा उभा केला आहे. (प्रतिनिधी)आमच्या एकूण ८ चाळी मिळून दरवर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतो. पण यंदाचे आमचे १०० वे वर्ष आहे. यामुळे सजावटीवर विशेष भर दिला आहे. हे वर्ष संस्मरणीय करण्यासाठी वाडीतील सगळ्यांचा सहभाग आहे. ५० व्या, ७५ व्या वर्षी आम्ही वेगळ्या प्रकारे उत्सव साजरा केला होता. पण या वर्षी अजूनच उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण नेहमी उत्सवात सहभागी होतात. - रमाकांत पारकर, मुख्य सचिव, आंबेवाडी सार्वजनिकगणेशोत्सव मंडळ, गिरगाव
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
By admin | Published: September 13, 2015 4:37 AM