जे.आर.डी. टाटांच्या पहिल्या विमानाची पुनर्भरारी; १९७१च्या युद्धावेळी तयार केलेल्या धावपट्टीचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:50 PM2021-10-15T19:50:27+5:302021-10-15T19:51:03+5:30
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जे.आर.डी. टाटा यांना अनोखी मानवंदना देण्याचा हेतूने 'इंडियन वुमन पायलट्स असोसिएशन'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुंबई : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचे जनक जे.आर.डी. टाटा यांच्या पहिल्या व्यावसायिक विमानाने शुक्रवारी पुन्हा गगनभरारी घेतली. १९७१ च्या युद्धावेळी भुज येथील महिलांनी ७२ तासांत तयार केलेल्या धावपट्टीचा वापर त्यासाठी करण्यात आला. सकाळी ११ वाजता या विमानाने भुजवरून उड्डाण केले आणि सायंकाळी ४ वाजता ते जुहू विमानतळावर दाखल झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जे.आर.डी. टाटा यांना अनोखी मानवंदना देण्याचा हेतूने 'इंडियन वुमन पायलट्स असोसिएशन'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जे.आर.डी. यांनी १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराची ते मुंबई मार्गावर टाटा एअरलाईन्सच्या पहिल्या व्यावसायिक विमानासह उड्डाण केले होते. या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी ८९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त 'डी हॅविलँड पुस मॉथ' विमानासह भुज ते मुंबई असा प्रवास करण्यात आला.
बोरीवलीची तरुण वैमानिक आरोही पंडित हिने या विमानाचे सारथ्य केले. लाइट स्पोर्ट एअरक्राफ्टसह अटलांटिक आणि प्रशांत महासागर पार करण्याचा विश्वविक्रम तिच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला पायलट आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता तिने भुजहून उड्डाण केले. टाटांनी पहिल्या उड्डाणावेळी जो मार्ग निवडला होता, त्याच मार्गे (कराचीहून उड्डाण शक्य नसल्याने भुजची निवड) आणि समतुल्य इंधन क्षमतेसह हे विमान मार्गस्थ झाले.
इतिहासाचा साक्षीदार-
ज्या ठिकाणाहून या विमानाने उड्डाण घेतले, ती जागा महिलांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणारी आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भुजच्या माधापर गावातील महिलांनी ७२ तासांत ही धावपट्टी तयार केली होती. हवाई दलाच्या विमानांनी येथूनच शत्रूला धूळ चारली होती. या घटनेची साक्षीदार असलेल्या माधापर गावातील महिलांनी लिहिलेल्या पत्रांचे वहन या विमानातून करण्यात आले. विशेष म्हणजे टाटांनीही आपल्या पहिल्या विमानातून कराचीहून टपाल मुंबईत आणले होते.
६० लिटरपेक्षा कमी इंधनाचा वापर-
भुज ते मुंबई हे ५०० सागरी मैलांचे अंतर ५ तासांत पार करण्यात आले. त्यासाठी त्यासाठी ६० लिटर पेक्षाही कमी पेट्रोलचा वापर झाला. अहमदाबाद विमानतळावर इंधनभरणा करण्यात आला. विशेष म्हणजे जीपीएस, ऑटो-पायलटसारख्या कोणत्याही संगणकीकृत उपकरणांचा वापर न करता हे उड्डाण पूर्ण करण्यात आले.
जे.आर.डी. टाटा यांनी भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राची पायाभरणी केली. त्यांना अशाप्रकारे मानवंदना देण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वैमानिक म्हणून ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. - आरोही पंडित, विश्वविक्रमवीर वैमानिक