Join us

मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 8:12 AM

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. २ वेळा सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोर्टाच्या निर्देशावरून घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा लागला. या निवडणुकीत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. या निकालानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सिनेट तो झाकी है, विधानसभा बाकी है अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. 

या निवडणुकीत जिंकलेल्या सदस्याने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, निकाल आमच्यासाठी औपचारिकता होती. निवडणूक आम्ही २ वर्षापूर्वीच जिंकलोय. आमची नोंदणी जास्त होती. सरकारकडून रडीचा डाव खेळला गेला. दोनदा निवडणुका रद्द करण्यात आल्या. हायकोर्टाने चपराक दिली म्हणून निवडणूक झाली. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. नियतीनं आणि जनतेनं कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने राहिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ आम्ही जूनमध्ये जिंकलो. पदवीधर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही आमच्यासोबत असल्याचं दाखवून दिले. पुन्हा एकदा निर्विवादपणे १० पैकी १० जागा जिंकून हा रेकॉर्ड कायम ठेवत खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. ३४ वर्षाच्या तरुणाने महाशक्तीला झोपवलं असं सांगितले. 

त्याशिवाय विरोधक हे कोर्टात जाणार आहेत पण त्याने काही फरक पडत नाही. जनतेच्या कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलाय. सुशिक्षित मतदार हा आमच्या बाजूने आहे. 'सिनेट तो झाकी है, विधानसभा अभी बाकी है' २७ सप्टेंबरला आज आम्ही सिनेट निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष करतोय. २७ नोव्हेंबरला विधानभवनावर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाचा जल्लोष करणार आहोत असा विश्वास या जिंकलेल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, हा जल्लोष इथवर थांबणार नाही. जोपर्यंत विधानसभेत आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसत नाही तोपर्यंत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक गप्प बसणार नाही. ठाण्याच्या त्या गद्दाराला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याला याचठिकाणी गाडणार. १० पैकी १० जागा आम्ही जिंकणार या १०० टक्के जिंकणार हा विश्वास आम्हाला होता. संपूर्ण युवकांची टीम ठाकरेंच्या पाठिशी आहे. येणाऱ्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच झेंडा फडकणार हा विश्वास आम्हाला आहे अशा भावना मुंबई विद्यापीठाबाहेर जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

आमचा स्ट्राइक रेट १०० टक्के

सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १०, ज्यांनी आम्हाला मतदान केले त्या सर्वांचे आणि शिवसेना युवासेनेच्या सहकाऱ्यांचे तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मन:पूर्वक आभार, मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही केवळ निकालाची पुनरावृत्ती केली नाही तर कामगिरीही सुधारली आहे. १०० टक्के स्ट्राइक रेट..इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी सिनेटच्या निकालावर दिली आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई विद्यापीठउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४