न्यायाधीशांवर भर कोर्टात पुन्हा भिरकावली चप्पल
By admin | Published: February 24, 2016 01:48 AM2016-02-24T01:48:26+5:302016-02-24T01:48:26+5:30
गुन्ह्यांमधून जामीन मिळत नसल्याच्या रागातून हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना मंगळवारी कुलाबा येथील सत्र न्यायालयात
मुंबई : गुन्ह्यांमधून जामीन मिळत नसल्याच्या रागातून हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना मंगळवारी कुलाबा येथील सत्र न्यायालयात घडली. आरोपीने अचानक केलेल्या या कृत्यामुळे न्यायालयातील सर्व जण
थोडा वेळ भांबावून गेले होते. चप्पल फेकण्याची पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी मुबारक मोमीन खान या तरुणाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.
खुनाच्या गुन्ह्यात २०१४ मध्ये पवई पोलिसांनी खानला अटक केली होती. सुनावणीसाठी वेळोवेळी त्याला न्यायालयात नेण्यात येत होते. मात्र त्याला जामीन मिळत नसल्याने तो वैतागला होता. मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सत्र न्यायालयाचे न्या. मुरुमकर यांच्यासमोर त्याला उभे करण्यात येणार होते. न्यायालयात प्रवेश करताच त्याने आपली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने फेकली. मात्र ती चप्पल त्यांच्या खुर्चीला लागून खाली पडली. खानने न्यायाधीशांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, मात्र कुलाबा पोलिसांनी वेळीच आवरले. पंधरवड्यातील अशाच प्रकारची ही दुसरी घटना आहे. ९ फेब्रुवारी रोजी दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या मदन गोविंद चौहान (३०) याने सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही. पाटील यांच्या दिशेने चप्पल फेकली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांपाठोपाठ शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत
आहे. (प्रतिनिधी)