‘न्यायाधीशांनी वेळेवर कोर्टात यावे’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:36 AM2020-01-10T04:36:22+5:302020-01-10T04:36:31+5:30
राज्यातील जिल्हा, कनिष्ठ न्यायालये व अन्य न्यायाधिकरणांतील न्यायाधीश व न्यायिक अधिकाऱ्यांनी रोज सकाळी ११च्या ठोक्याला न्यायासनावर बसून न्यायालयाचे काम सुरू करावे
मुंबई : राज्यातील जिल्हा, कनिष्ठ न्यायालये व अन्य न्यायाधिकरणांतील न्यायाधीश व न्यायिक अधिकाऱ्यांनी रोज सकाळी ११च्या ठोक्याला न्यायासनावर बसून न्यायालयाचे काम सुरू करावे आणि ते न्यायालयीन कामकाजाची वेळ संपेपर्यंत पूर्णवेळ चालवावे, असे निर्देश मुख्य न्यायाधीशांनी दिले आहेत.
अलीकडे केलेल्या तपासणीमध्ये कनिष्ठ न्यायालयांच्या कामात अनेक त्रुटी आणि अनुचित बाबी निदर्शनास आल्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांचे परिपत्रक उच्च न्यायालायचे निबंधक (तपासणी-१) एस. जी. डिगे यांनी सर्व प्रधान जिल्हा न्यायाधीशांना गेल्या आठवड्यात पाठविले आहे.
या परिपत्रकानुसार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ निकाल राखीव ठेवू नये आणि तो जाहीर केल्यावर लगेच कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड करावा. दिवसाच्या बोर्डावर लावलेली सर्व प्रकरणे सुनावणीस घेणे शक्य होणार नाही, असे वाटल्यास, पक्षकारांना दिवसभर ताटकळत न ठेवता लगेच पुढची तारीख द्यावी. साक्षीदारास साक्षीसाठी बोलावले असल्यास त्याची साक्ष शक्यतो त्याच दिवशी पूर्ण करावी. न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी काही आसने राखून ठेवावीत. जिल्हा न्यायाधीश किंवा संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेऊन किंवा त्यांना पूर्वकल्पना देऊन मगच मुख्यालय सोडून बाहेर जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
>पर्यवेक्षणाचा अधिकार
राज्यघटनेच्या अनुच्छेद २२७ अनुसार उच्च न्यायालयास राज्यातील कनिष्ठ न्यायालयांवर पर्यवेक्षणाचे अधिकार दिलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून या न्यायालयांची नियमित तपासणी केली जाते व तपासणीत ज्या उणिवा अथवा अनुचित बाबी आढळतील त्या दूर करण्याचे निर्देश दिले जातात. मात्र कोर्टात वेळेवर न येणे अथवा दिवसभर कोर्टात न बसणे, दीर्घकाळ निकाल राखून ठेवणे व सुनावणी होऊ शकेल त्याहून अधिक प्रकरणे बोर्डावर लावून पक्षकारांना व वकिलांना ताटकळत ठेवणे हे प्रकार उच्च न्यायालयातही दिसतात. मात्र यासाठी तेथील न्यायाधीशांना असे निर्देश देण्याची सोय नाही.