1993 मुंबई साखळी स्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:33 AM2017-09-07T10:33:29+5:302017-09-07T14:30:23+5:30

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

The judgment of convicts in 1993 blasts with Abu Salem will take place shortly | 1993 मुंबई साखळी स्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा

1993 मुंबई साखळी स्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा

Next

मुंबई, दि. 7 - 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अबू सालेमच्या आधी न्यायालयाने करीमुल्लाह खानला शिक्षा सुनावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यालाही दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. ताहिर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून रियाज सिद्दीकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

पोर्तुगाल व भारत यांच्यातील करारानुसार, सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्याला जन्मठेप द्यावी, अशी विनंती विशेष सीबीआय वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.  प्रत्यार्पण कायद्यामुळे अबू सालेमला 25 वर्षांहून जास्त शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. त्यानुसार त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून यामधील 12 वर्षांची शिक्षा त्याने आधीच भोगली आहे. त्यामुळे अजून पुढची 13 वर्ष त्याला कारागृहात घालवावी लागणार आहेत. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास अबू सालेमला आजन्म जन्नठेपेची शिक्षा होऊ शकते.

1993 साखळी बॉम्बस्फोटातील अटक आरोपींना दोषी ठरविल्यानंतर विशेष सीबीआय वकिलांनी सालेम सोडून, सर्वांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने ताहिर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. रियाज सिद्दीकाला 10 वर्षांची शिक्षा आणि करीमुल्लाह खानला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 

16 जूनला विशेष टाडा न्यायालयाने 1993 साखळी बॉम्बस्फोटांच्या दुस-या टप्प्यातील आरोपी, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरविले होते. त्यात 28 जून रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या मुस्तफा डोसाचाही समावेश होता. न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले होते. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले होते. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते.   

सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले होते. 

12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटून गेली आहेत. साखळी बॉम्बस्फोट घडवूण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. यामध्ये एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश होता.

आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू
1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा 28 जून रोजी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.

विशेष टाडा न्यायालयाने 16 जून रोजी त्याला 1993 साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले होते.
डोसाची तब्येत बिघडल्याने मंगळवारी मध्यरात्री 1च्या सुमारास त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन तासांच्या उपचारानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले. पण काही काळाने त्याला ताप आला व छातीतही दुखू लागले. सकाळी पुन्हा त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2.30च्या सुमारास डोसाचा मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली होती.

1993 बॉम्बस्फोटांतील डोसाची भूमिका-
सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने १९९५ साली दिलेल्या जबाबावरून मुस्तफा डोसाला या स्फोटाचा आरोपी करण्यात आले. त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 मार्च 2003 रोजी अटक करण्यात आली. मात्र डोसाने आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा दावा न्यायालयापुढे केला होता.
 

Web Title: The judgment of convicts in 1993 blasts with Abu Salem will take place shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.