Join us

जुहू सिल्व्हर बीचवर कचऱ्याचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 9:51 AM

सेलिब्रिटींसह बीच वॉकर्सने बीचकडे फिरवली पाठ

मनोहर कुंभेजकर

मुंबई - विलेपार्ले बस स्थानकापासून सरळ 10 मिनिटे चालत गेल्यावर सुमारे 1.5 किमीचा जुहू सिल्व्हर बीच लागतो. सध्या पावसाळ्यात समुद्र हा खवळलेला आहे. त्यामुळे रोज समुद्र हा  कचरा व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्र किनाऱ्यावर फेकत आहे. जुहू सिल्व्हर बीच हा पूर्णपणे कचऱ्याने अस्वच्छ झाला आहे. गेल्या 10 दिवसात येथे मोठ्या प्रमाणात वाळूत सुमारे 2 ते 3 फूट पाय खोल जाईल इतका 100 डंपर कचरा व प्लाटिक मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या कचऱ्याची व प्लास्टिकची वाळूत रुतून आता पेस्ट झाली आहे. त्यामुळे येथे बीचवर चालायला जागाच शिल्लक राहिली नसल्याची माहिती सी गार्डिंयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.

बीचच्या झालेल्या कचराकुंडीमुळे अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शबाना आझमी, जीनत अमान, राज कुंद्रा आणि अन्य सेलिब्रिटी व उद्योगपती यांच्यासह रोज येथे सकाळ व संध्याकाळी येणाऱ्या बीच वॉकर्सने पाठ फिरवल्याची माहिती कानोजिया यांनी दिली. मुंबई महानगर पालिकेला नावलौकिक आहे. पालिकेने या बीचची रोज स्वच्छता केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकमतने देखील येथील कचऱ्याच्या समस्येविरोधात नुकताच ऑनलाईन लोकमत व वर्तमानपत्रातून आवाज उठवला होता. लोकमतच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

पालिकेच्या के पश्चिम वॉर्डने याकडे दुर्लक्ष केले असून जुहू बीच साफ करणाऱ्या कंत्राटदारांनी याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती सी गार्डिंयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना दिली. मात्र सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात कचरा मुंबईतील बीचवर येत आहे. गेल्या 30 दिवसात जुहूच्या सिल्व्हर बीचवर रोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्यामुळे या बीचला अस्वच्छ स्वरूप आले आहे. 100 डंपर कचरा जमा झाला आहे. हा कचरा मग भरतीत समुद्रात वाहून जातो आणि मग परत हाच कचरा येथे भरतीत फेकला जातो. कचऱ्याचे व प्लास्टिक चे सेवन समुद्रातील जलचर प्राणी व विविध प्रकारची मासळी करत असल्याने मत्स्यव्यवसायावर देखील मोठा परिणाम होत असून गेले दोन ते तीन महिने मृत डॉल्फिन समुद्रकिनारी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात स्वच्छतेसाठी आग्रही असताना मात्र मुंबई महानगर पालिकेनेच त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुनील कानोजिया यांनी केला. गेली 10 वर्षे रोज सकाळी ते बीचवर येतात आणि सोशल मीडियावरून जुहूच्या सिल्व्हर बीचची आजची सद्यस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ आणि फोटोद्वारे थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना देत असतात. आज खास लोकमतच्या सदर प्रतिनिधीला सकाळी 7.15 वाजता त्यांनी या बीचची विदारक स्थितीची सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :मुंबई