जुहू पोलिसांकडून ५८ किलो गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:38+5:302021-07-18T04:06:38+5:30
मुंबई : जुहू पोलिसांनी एका विशेष कारवाईअंतर्गत ५८ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची किंमत जवळपास ११ लाख रुपये ...
मुंबई : जुहू पोलिसांनी एका विशेष कारवाईअंतर्गत ५८ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची किंमत जवळपास ११ लाख रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एकाचा तेलंगणामधून गाशा गुंडाळण्यात आला आहे.
विलेपार्लेच्या नेहरुनगर झोपडपट्टीमध्ये अमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे, मासवेकर, पोलीस उपनिरीक्षक धवले, रक्षे, पाटील आणि पथकाने त्याठिकाणी सापळा रचत मोहन राठोड (वय ४८) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तमिळनाडूतील त्याचा साथीदार मारुती जनबंधू (६५) याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला तमिळनाडूतून अटक करण्यात आली. त्याच्या झडतीत पोलिसांनी ५७ किलो गांजा हस्तगत केला आहे. जो व्यावसायिक उद्देशाने त्याने सोबत ठेवला होता, अशी माहिती असून त्याची बाजारातील किंमत ११ लाख ५४ हजार रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. जनबंधू राठोड याला गांजा पुरवत असून त्याचे कोणी साथीदार आहेत का, याबाबत जुहू पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.