संस्थेआडूनच ज्युलियाने केला सारा खेळ; सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा डाव फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:37 AM2023-10-04T05:37:22+5:302023-10-04T05:37:33+5:30
बाळ चोरी प्रकरणातील मास्टरमाइंड उच्चशिक्षित असलेली ज्युलिया फर्नांडिस ही ‘अहम’ नावाची संस्था चालवत होती.
मुंबई : बाळ चोरी प्रकरणातील मास्टरमाइंड उच्चशिक्षित असलेली ज्युलिया फर्नांडिस ही ‘अहम’ नावाची संस्था चालवत होती. या संस्थेच्या माध्यमातून गरजू गरीब नागरिकांना मदतीच्या बहाण्याने ती ‘सावज’ हेरत असे तर याच माध्यमातून गर्भवती महिलांना टार्गेट करून त्यांच्यामार्फत हे बाळ विक्रीचे रॅकेट सुरू होते. पुढे, तिची सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचीही धडपड सुरू होती.
फर्नांडिसने विधि शाखेत शिक्षण घेतले असल्यामुळे कायद्याचे ज्ञान आहे. त्यामुळे कायद्यातील पळवाटादेखील माहिती असल्याने यातून बाहेर पडण्यात ती वेळोवेळी यशस्वी व्हायची. नुकतेच गुन्हे शाखेच्या कारवाईतून जामिनावर बाहेर येत नाही तोच शिवाजीनगरमध्ये दुसऱ्या कारवाईत ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. फर्नांडिस वरळी भागात कुटुंबीयांसोबत राहते. तिने वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ शाखेतील शिक्षण घेतले आहे. तिने स्वतःचे सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी तिची रवानगी कोठडीत केली आहे.
फर्नांडिस गेल्या तीन ते चार वर्षांपासून अहम संस्थेशी जोडली गेली. या संस्थेच्या माध्यमातून विविध झोपडपट्टी परिसर पिंजून काढायचा. त्यांना विविध मदत पोहोचविण्याचे काम करायची. यादरम्यान महिलांचे प्रश्न जवळून हाताळत तिचे एजंट तयार करत होती. याच कनेक्शनमधून गरजू महिलांची नाळ शोधून त्यांना पैशांचे आमिष दाखवून बाळांची विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पथक अधिक तपास करत आहे.
आयवीएफ सेंटरमार्फत बाळांसाठी ग्राहक
आयवीएफ सेंटरसाठी ती काम करायची. त्यामुळे ज्यांना बाळ होत नाही अशा दाम्पत्याना हेरून त्यांना अवैधरीत्या या बाळांची विक्री करत होती.
गुन्हे शाखेचे मिशन बेबी
“बाळ सुंदर आहे”चा कोडवर्ड वापरताच गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दिवसांच्या बाळाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक केली. पोलिसांच्या ‘मिशन बेबी’ अंतर्गत बाळाच्या खऱ्या पालकांचा शोध सुरू आहे. मुंबईत जुलियो फर्नांडिस नावाची महिला बाळ विक्री करत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाला मिळाली. तेथून ही बाब गुन्हे शाखेला समजताच, जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे फर्नांडिससोबत संपर्क साधतात तिने साडेचार लाखांत विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, सापळा रचून बाळाची सुटका करत फर्नांडिस आणि केअर टेकर महिलेवर पोलिसांनी कारवाई केली.