मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर तुरळक पाऊस पडला. मात्र शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर पुढच्या आठवड्यात १७, १८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ८ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. गुरुवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत सर्वत्र हजेरी लावली. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासून अधूनमधून पावसाची रिपरिप होती.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
शुक्रवार : ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टशनिवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टरविवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टसोमवार : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
१७, १८ आणि १९ जुलैबाबतच्या पावसाबाबत आता बोलणे उचित होणार नाही. मात्र, शुक्रवारसह शनिवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी एकूण ३०० मिलिमीटर पाऊस पडू शकतो. शिवाय १७, १८ आणि १९ या दिवशी कदाचित मोठ्या पावसाची शक्यता असून, मुंबईत पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे -अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक
१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते -माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ