Join us

गिरणी कामगारांसाठी जुलैमध्ये ३ हजार ८३५ घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:15 AM

गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांपैकी ३ हजार ८३५ घरांची लॉटरी जुलैच्या अखेरीस काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई : लोअर परळ येथील श्रीनिवास मिल आणि वडाळ्यातील बॉम्बे डाईंग मिलच्या जागांवर गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांपैकी ३ हजार ८३५ घरांची लॉटरी जुलैच्या अखेरीस काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.म्हाडामार्फत २०१२ साली ६ हजार ९७५ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र अद्याप या लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर तब्बल चार वर्षांनी म्हणजेच २०१६ साली सहा गिरण्यांच्या जागेवरील २ हजार ४३६ घरांची लॉटरी काढण्यात आली. यानंतर त्याच साली एमएमआरडीएच्या २ हजार ४१८ घरांची लॉटरी काढण्यात आली. यामुळे अद्याप १ लाख ६३ हजार गिरणी कामगार घराच्या स्वप्नापासून वंचित आहेत.म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जुलै अखेरीस ३ हजार ८३५ घरांची लॉटरी काढणार असल्याचे जाहीर केले. मात्र, ही घरे आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाली होती. या सरकारने गिरणी कामगारांचा विचार करून त्यांच्यासाठी घरांची तरतूद करावी, अशी मागणी गिरणी कामगारांकडून केली जात आहे.>१२ हजार जणांना ताबा नाहीम्हाडाने गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आखलेली योजना धिम्या गतीने सुरू असल्याने गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले आहे. १,७५०० गिरणी कामगारांच्या वारसदारांनी घरांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील सुमारे १२ हजार गिरणी कामगारांना लॉटरीमध्ये घरे जाहीर झाली आहेत. बहुतांश जणांची कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांना या घरांचा ताबा मिळालेला नाही.

टॅग्स :म्हाडा