जुलै, पृथ्वीवरील सर्वाधिक ‘ताप’दायक महिना; जानेवारी ते जुलै २०१९ हा तिसरा उष्णकाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 06:01 AM2019-08-18T06:01:01+5:302019-08-18T06:05:13+5:30
जानेवारी ते जुलै २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ म्हणून नोंदविण्यात आला आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : देशभरात मान्सूनचा महापूर आला असतानाच दुसरीकडे जागतिक तापमानवाढीचे चटके दिवसागणिक वाढतच आहेत. जुलै महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे हा महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १९ जुलै रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ नोंदविण्यात आले होते. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत हे कमाल तापमान ६ अंशाने अधिक होते. जुलै महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान होते. २२ जुलै १९६० रोजी ३४.८ एवढ्या तापमानची नोंद झाली होती.
नॅशनल ओशिएन अॅण्ड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्टेÑशनने २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्या वेळी तापमानवाढीतील हा फरक आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे या नोंदी घेण्याचे काम सुरू असतानाच गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये संपूर्ण युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला होता. जुलै महिन्यात अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे जानेवारी ते जुलै २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ म्हणून नोंदविण्यात आला आहे. २०१६ आणि २०१७ साली तापमानात उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात येत असून, समुद्री तापमानातही वाढ असल्याच्या नोंदी नॅशनल ओशिएन अॅण्ड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्टेÑशनने घेतल्या आहेत.
दुसरीकडे जगभरात कार्बन उत्सर्जनाबाबत उल्लेखनीय पावले उचलण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यास वेग आलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरण बदलाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जागतिक तापमानवाढ या विषयावर काम करत असलेल्या आयपीसीसी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या म्हणण्यानुसार, तापमानवाढीची मर्यादा पाळली नाही तर त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील.
सावधान! दवाऐवजी होतेय बर्फवृष्टी
- देशात मध्य प्रदेश, विदर्भ व मराठवाड्यात दवाऐवजी बर्फवृष्टी झाली होती. पिके वाया गेली होती. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढ्यात पीक येत नसल्याचे चित्र आहे.
- जागतिक प्रदूषणाचा विचार करायचा झाल्यास ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे.
- दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी जीव हजारो, लाखोंच्या संख्येत नष्ट होत आहेत.
- औद्योगिकीकरणामुळे झालेल्या कार्बन उत्सर्जनामुळे सूर्याची उष्णता शोषली जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सुमारे १.५ अंश या धोक्याच्या पातळीवर गेले आहे.
न्यूझीलंडचा उत्खनन बंद करण्याचा निर्णय
महासागराचे पाणी व ध्रुव प्रदेशातील बर्फाची हजारो कोटी टन अधिकची वाफ दरवर्षी वातावरणात जात आहे. त्या वाफेचे पुन्हा पाणी वा बर्फ होऊन ती अवकाळी, अतिवृष्टी व हिमवृष्टीच्या रूपात कोसळत आहे. उल्लेखनीय म्हणजे न्यूझीलंड देशाने नवे तेल व वायूंचा शोध आणि उत्खनन बंद करण्याचा व बारा वर्षांत तेल वापर थांबवण्याचा निर्णय घेतला.