Join us

जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: २९ ऑगस्टला किशोरी पेडणेकर यांचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 6:45 AM

या प्रकरणात नाहक गोवले असून आपण निर्दोष असल्याचा पेडणेकर यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर २९ ऑगस्टला फैसला होणार आहे. सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी हे यावर निर्णय सुनावणार आहेत. तर तूर्तास किशोरी पेडणेकर यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले असून, आपण निर्दोष असल्याचा दावा करीत किशोरी पेडणेकर यांनी ॲड. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्यापुढे गुरुवारी सुनावणी झाली.

महत्त्वाच्या बाबी

  • सुनावणीत बॉडी बॅग पुरवठादार वेदांता इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने बाजू मांडण्यात आली. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही क्वालिटीनुसार पैसे स्वीकारले असून, त्यानुसार सामान पुरवले.
  • आम्ही एकटेच निविदाकार होतो तसेच पालिकेच्या अटी, शर्तींचे पालन केले आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना संपर्क केलेला नाही. सरकारने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला. 
  • न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत यावरील निर्णय राखून ठेवला.
टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबईकोरोना वायरस बातम्या