सायन येथेदेखील जंबो कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:05+5:302021-04-14T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, आता सायन येथील सोमय्या मैदानाच्या जागेवर नवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, आता सायन येथील सोमय्या मैदानाच्या जागेवर नवीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या निर्माणासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेडसह याठिकाणी सुमारे ५०० हून अधिक रुग्ण खाटांचे केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.
सोमय्या मैदानाच्या जागेवर ५०० हून अधिक रुग्ण खाटांचे सेंटर बनवले आहे. यामध्ये २०० हून अधिक ऑक्सिजन बेडची सुविधा असेल. या सेंटरची जबाबदारी एमएमआरडीए किंवा सिडको यांच्यावर सोपवली जाणार आहे. सोमय्या मैदानाच्या जागेत ही व्यवस्था झाल्यास पूर्व उपनगरातील कोविड बाधित रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. दुसरीकडे वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात १५० रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात २२५ रुग्णशय्या क्षमतेच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पणदेखील नुकतेच करण्यात आले आहे.
वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमतादेखील ५०० वरून वाढवून ती आता ८०० इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे नेहरू विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय व एनएससीआय मिळून एकूण १,१७५ रुग्णशय्या उपलब्ध होऊन कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णशय्यांमधील एकूण ७० टक्के रुग्णशय्या ऑक्सिजनपुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.