Join us

जम्बो कोविड केंद्रांना, सज्ज राहण्याचे आदेश; सुरेश काकाणी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 9:20 AM

राष्ट्रीय स्तरावर राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ६२ टक्के असल्याची माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यातील संसर्ग वाढीप्रमाणे पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

मुंबई: दैनंदिन रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील जम्बो कोविड केंद्रांना सज्ज राहण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. मुंबईत आठ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध असून, सध्या ४५१ हून अधिक रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.राष्ट्रीय स्तरावर राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ६२ टक्के असल्याची माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यातील संसर्ग वाढीप्रमाणे पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. वांद्रे-कुर्ला जम्बो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले, रुग्ण वाढल्याने खाटा आरक्षित होत आहेत. शिवाय अतिदक्षता विभागाची गरज असणाऱ्या रुग्णांतही वाढ दिसून आली आहे. मात्र, मृत्यूंचे प्रमाण अजूनही स्थिरावले आहे.राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, घरगुती विलगीकरणाचे नियम न पाळल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहर उपनगरातही कोरोना रुग्ण असणारे नागरिक सर्रास सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे.  राज्यात सध्या ५ लाख ८३ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ५ हजार ४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात सध्या २५ हजार ६७३ रुग्ण, नागपूरमध्ये १६ हजार ९६४, मुंबईत १२ हजार ५३५ आणि ठाण्यात १२ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याहॉस्पिटल