मनीषा म्हात्रे
मुंबई :रागात आणि गैरसमजातून घडलेल्या घटनेच्या ओझ्याने तणावात असलेला मुलगा कामासाठी जातो सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर ऐरोली खाडी पुलावर त्याची दुचाकी मिळाल्याने कुटुंबियांचा पायाखालची जमीन सरकली. नातेवाईक, शेजाऱ्यांमध्ये मुलाने १०० फुटांवरून खाली उडी घेतली तर वाचणे अशक्यच अशी चर्चा सुरु झाली. तीन दिवस उलटूनही हाती काहीच न लागल्याने अखेर वडिलाने वरिष्ठांच्या कार्यालयात ठिय्या मांडत थेट पोलिसाला सोबत घेत खाडीत शोध सुरु केला. अवघ्या काही मिनिटातच, "प्लिज हेल्प"ची मुलाची हाक वडिलांच्या कानावर पडली. तीन दिवस मदतीच्या प्रतीक्षेत तिवरांमध्ये अडकून खाडीवर तरंगत राहिलेल्या मुलगा नजरेत पडला. आणि अखेर वडिलांनीच मुलाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढल्याची सर्वाना आचंबित करणारी घटना मुलुंडमध्ये समोर आली.मुलुंड परिसरात महिंद्र नाकेर हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. १७ जुलै रोजी मुलुंडच्या जिममध्ये एका तरुणाच्या डोक्यात मुदगल मारले म्हणून त्यांचा मुलगा धरव नाकेरला नवघर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी तो जामिनावर बाहेर आला. घडलेल्या प्रकाराचा पश्चाताप झाल्याने त्याने कुटुंबियांसह सर्वांची माफी मागितली. मात्र, जिममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरील टीकात्मक, आक्षेपार्ह कमेंटमुळे तो खचला. कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली. सोमवारी पर्सनल ट्रेनिंगसाठी जातो सांगून तो बाहेर पडला. घरी परतून आईला कामाचे पैसेही दिले. त्यानंतर, दुपारी तिसऱ्यांदा ट्रेनिंगच्या कामाचे बघून येतो सांगून बाहेर पडला. मात्र, सायंकाळी थेट त्याची दुचाकी ऐरोली ब्रिजवर मिळाल्याचा कॉल पोलिसांकडून वडिलांना आल्याने त्यांना धक्का बसला.वडिलांच्या नावावर गाडी असल्याने महेंद्र यांनी थेट पोलीस ठाणे गाठून चौकशी केली. मुलगा गायब झाल्याप्रकरणी तक्रार दिली. आई वडील आणि भावासह नातेवाईकांनी शोध सुरु केला. त्यात एकाने ब्रिजवरून उडी घेतल्याच्या वृत्ताने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तीन दिवस उलटूनही पोलिसांकडून साधे त्याचे शेवटचे लोकेशन न मिळाल्याने वडिलांनी गुरुवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांची भेट घेत तपासात गती नसल्याची खंत वर्तवली. त्यांनीही तात्काळ यात दखल घेण्यास सांगून नाकेर यांना सोबत घेत शोध घेण्यास निघाले. ऐरोली खाडीतील तिवरांच्या दिशेने सर्च ऑपरेशन सुरु झाले. काही तासांतच त्यांच्या मुलाची "प्लिज हेल्प"ची हाक त्यांच्यापर्यंत पोहचली. मुलाला सुखरूप बाहेर काढून त्यांनीही हंबरडा फोडला. त्याला मिठीत घेत सुखरूप बाहेर काढले. मुलगा भेटल्याचा व्हिडीओ कॉल पत्नीला करताच त्यांच्याही आनंदाश्रूंनी बांध फुटला.बॉडी ओळखण्यासाठी बोलावले होते...गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यातून येलोगेट पोलिसांना मिळालेल्या मृतदेह तुमच्या मुलाचा नाही हे पाहण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. जड पावलांनी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, तो मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचा निघाल्याने त्यांनी पुन्हा सुटकेचा निश्वास टाकला.तपास अधिकारी सुट्टीवरत्यांचे प्रकरण हाताळणाऱ्या तपास अधिकारी यांच्याकडे महेंद्र नाकेर सतत कॉल करून मुलाच्या तपासाबाबत चौकशी करायचे. मात्र, त्या सुट्टीवर गावी गेल्याने त्यांना सतत कॉल करू नका. सोमवारी आल्यावर बघू असे उत्तर मिळाले होते.देवाच्या कृपेने मुलगा मिळाला...देवाच्या कृपेने मुलाला दुसरे जीवनदान मिळाले आहे. पोलिसांनी थोडी मेहनत घेतली असती तर मुलगा वेळीच भेटला असता. मात्र, सध्या आमचा जीव जणू परत मिळाला आहे.- महेंद्र नाकेर, धरव नाकेर