Join us

Video: दिंडोशीत बिबट्याच्या या गच्चीवरून त्या गच्चीवर उड्या! सुनिल प्रभूंनी विधानसभेत प्रश्न मांडला

By मनोहर कुंभेजकर | Published: March 10, 2023 12:59 PM

विधानसभेत ठाकरे गटाच्या प्रभू यांनी लोकमतच्या बातमीची झेरॉक्स काढून दाखविली.

दिंडोशीमध्ये म्हाडा कॉलनी आहे, त्यात ५०० कुटुंबे राहतात. गेल्या दोन दिवसांपासून मुक्तपणे बिबट्याचा संचार आहे. त्याचे फोटो लोकमत ऑनलाईनला आले आहेत. वनमंत्री आज सभागृहात नाहीत. सतत सात-आठ महिन्यांनी बिबट्या फिरू लागला की नागरिकांत दहशत होते. आजचे आज अधिकाऱ्यांनी या बिबट्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी दिंडोशीचे आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत केली आहे. 

विधानसभेत ठाकरे गटाच्या प्रभू यांनी लोकमतच्या बातमीची झेरॉक्स काढून दाखविली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी न्यू दिंडोशीत गोरेगाव (पूर्व) म्हाडाने सुमारे २००५ साली बांधलेले रॉयल हिल्स सहकारी संस्थेत ७७ बंगले आहेत. मात्र येथे मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने येथील सुमारे ५०० रहिवासी भयभीत झाले आहे. विशेष म्हणजे भक्ष्य शोधण्यासाठी दि,७ आणि दि,८ मार्चला सलग दोन दिवस बिबट्या मध्यरात्री येथील बंगल्याच्या या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत मुक्त संचार करत असल्याने आमची रात्रीची झोपच उडाली असल्याची माहिती रॉयल हिल्स सहकारी संस्थेचे अध्यक्ष  दीपक दिवटे आणि सचिव अजित जठार यांनी लोकमतला दिली होती. 

वनविभाग आणि इतर संबंधित सरकारी अधिकारी या जीवघेण्या धोकादायक जीवन परिस्थितीकडे लक्ष देत नाहीत.यापूर्वी वनखात्याला तक्रारी व पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या बंगलो धारकांच्या सुरक्षिततेकडे वनखात्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.विशेष म्हणजे येथे बिबट्या सोसायटी च्या आवारात फ्लड लाईट्स असून सुद्धा येतो एवढी बिबट्याची डेरिंग असल्याचे जठार म्हणाले.आमच्या सोसायटीच्या मागील बाजूस संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी आणि पत्रव्यवहार आम्ही म्हाडाकडे अनेक वेळा केली होती,परंतू आमच्या मागणीला म्हाडाने केराची टोपली दाखवली असा आरोप त्यांनी केला.तात्काळ आमच्या संरक्षणाची व्यवस्था करावी अशी कळकळीची विनंती येथील रहिवाश्यांनी लोकमतच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. 

टॅग्स :बिबट्याम्हाडासुनील प्रभूअर्थसंकल्पीय अधिवेशनविधानसभा