दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:43 AM2022-06-04T06:43:03+5:302022-06-04T06:43:19+5:30

तपासात, जुनैदचे १५ फेसबुक अकाऊंट, १० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत.

Junaid's Kashmir war for terrorist activities; Aftab remanded in ATS custody till June 14 | दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी

दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी

googlenewsNext

मुंबई : लष्कर ए तैय्यबाच्या अतिरेकी संघटनेत राज्यातील तरुणांना भरती करून त्यांना दहशतवादी कारवायांच्या शस्त्र प्रशिक्षणासाठी जम्मू - काश्मीरला नेण्याच्या तयारीत असलेला जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (२८) पाठोपाठ काश्मीरमधून  आफताब हुसैन शाह (२८) एटीएसच्या हाती लागला. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जुनैदच्या कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ केली तर आफताबला १४ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

तपासात, जुनैदचे १५ फेसबुक अकाऊंट, १० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. त्याने वर्षभरात ५ ते ७ वेळा काश्मीरवारी केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, एटीएस दोघांकडे अधिक तपास करत आहे. एटीएसच्या चौकशीत, जुनैद हा जम्मू-काश्मीर येथील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाच्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना लष्कर-ए-तैय्यबा या अतिरेकी संघटनेत भरती करून त्यांना दहशतवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्याकरिता जम्मू-काश्मीर येथे नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी जम्मू-काश्मीर येथील बँक खात्यावरून त्याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचेही दिसून आले आहे. त्याला २४ मे रोजी पुण्यातून अटक केली.

वर्षभरात तो दहशतवादी कारवायांशी संबंधित बैठकीसाठी ५ ते ७ वेळा काश्मीरला गेल्याचे चौकशीत समोर आले. तसेच त्याचे १५ फेसबुक आणि ७ व्हॉट्सॲप ग्रुपही एटीएसच्या रडारवर आले आहेत. याच माध्यमातून तो तरुणांचे मतपरिवर्तन करून त्यांना अतिरेकी संघटनेत सहभागी करून घेण्याचे काम करत होता. तसेच ११ सीमकार्डही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.

हस्तकांमधील महत्त्वाचा दुवा
जुनैदच्या संपर्कातील सुतार काम करत असलेल्या आफताबला किश्तवार येथून अटक केल्यानंतर, त्यालाही कोठडीसाठी पुणे  न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुनैद आणि तो परदेशात कार्यरत असलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या हस्तकांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. दोघांच्या चौकशीतून अन्य आरोपींचा एटीएसकडून शोध सुरू आहे.

Web Title: Junaid's Kashmir war for terrorist activities; Aftab remanded in ATS custody till June 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.