स्थानिक स्वराज्य संस्थांत ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:50+5:302021-01-08T04:14:50+5:30
- ग्रामविकास मंत्री लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस हा स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा ...
- ग्रामविकास मंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस हा स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. त्यामुळे या दिनाचे महत्त्व आणखीन दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.
या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी गुढी उभारून त्यास अभिवादन करावे व महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रम पार पाडावा. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होणे अनिवार्य आहे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.
रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हेतर, अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.