मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकलसाठी आवश्यक असणारी प्लॅटफॉर्मची आणि अन्य तांत्रिक कामे फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात येणार असली तरी या मार्गावर सर्व लोकल १२ डबा करण्यास जून महिना उजाडणार आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यापर्यंत हार्बरवर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परावर्तनही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. हार्बरवर १२ डबा लोकलचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्राधान्य दिले जात आहे. या कामासाठी सीएसटी स्थानकात हार्बरच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे तसेच रुळांचे किरकोळ काम ११ फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री ३ ते ४ तास चालणार आहे. हे काम पूर्ण होताच १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे मुख्य काम केले जाणार असून, या कामासाठी सीएसटी ते वडाळादरम्यानची लोकल सेवा बंद ठेवली जाईल. सध्या हार्बर मार्गावर ९ डब्याच्या ३६ लोकल धावत असून, त्याच्या ५३६ फेऱ्या होतात. मध्य रेल्वेने केलेल्या नियोजनानुसार ९ डब्यांच्या ३६ लोकलपैकी २0 लोकल एप्रिलपर्यंत १२ डबा केल्या जातील. त्यानंतर मे अखेरपर्यंत आणखी १० लोकल १२ डबा लोकलमध्ये परावर्तीत केल्या जाणार आहेत व शेवटी उर्वरित ६ लोकल १५ जूनपर्यंत १२ डबा होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जादा ११ फेऱ्या दाखल होतील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मध्य रेल्वेवर नवीन वर्षात एकूण ४0 जादा लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जानेवारीपासून ४0 फेऱ्यांपैकी २२ जादा फेऱ्या ठाणे, वाशी या ट्रान्स हार्बरवर तर ७ फेऱ्या हार्बरवर २६ जानेवारीपासून चालविण्यात आल्या. त्यानंतर उर्वरित ११ लोकल फेऱ्या या मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर चालविण्यात येणार आहेत. 9 डबा लोकल १२ डबा करण्यासाठी मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात डब्यांची गरज आहे. यासाठी पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीशी बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी हार्बरचा खोळंबामुंबई : शिवडीजवळ रुळाला तडा गेल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर सेवा विस्कळीत झाली आणि चाकरमान्यांना प्रचंड हाल सोसावे लागले. दुपारच्या सुमारास रबाळेजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ठाणे-वाशी, पनवेल ही ट्रान्स हार्बर सेवाही विस्कळीत झाली. या दोन्ही घटनांमुळे एकूण २१ लोकल फेऱ्या रद्द झाल्या आणि ५0 पेक्षा जास्त फेऱ्यांना लेटमार्क लागला. सकाळी ८.५४ च्या सुमारास हार्बरवरील वडाळा ते शिवडी दरम्यान अप (सीएसटी दिशेने) मार्गावर रुळाला तडा गेला. रुळाची दुरुस्ती होईपर्यंत सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल सेवांवरही परिणाम झाला. डाऊन मार्गावरील लोकल सेवा हळूहळू सुरू ठेवण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात होता. मात्र त्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. सकाळी ९.३२ च्या सुमारास रुळाची दुरुस्ती केल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र त्यानंतरही लोकल अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. दुपारी दीडच्या सुमारास रबाळेजवळ अप मार्गावर एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने ठाणे ते वाशी, पनवेल दरम्यानची सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास सायंकाळचे चार वाजले. (प्रतिनिधी)
जूनपर्यंत हार्बरवर ‘बारा डबा’
By admin | Published: February 05, 2016 3:50 AM