कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक करणार धरणे आंदोलन; शिक्षणमंत्री दुर्लक्ष करत असल्याने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:26 AM2022-03-15T07:26:41+5:302022-03-15T07:26:50+5:30
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू आहे, त्यातच आजपासून दहावीची परीक्षाही सुरू होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या ...
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू आहे, त्यातच आजपासून दहावीची परीक्षाही सुरू होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या मागण्या शालेय शिक्षण मंत्र्यांकडून पूर्ण न झाल्याने तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत आजपासून कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाकडून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महासंघासमवेत २२ जून २०२१ रोजी शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महासंघाच्या मान्य करण्यात आलेल्या कोणत्याही मागण्या अद्याप पूर्ण करण्यात न आल्याने महासंघाकडून हा निर्णय मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महासंघाने यापूर्वी ३ मार्च रोजी पत्र देऊन महासंघाशी चर्चा करून प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता; परंतु शिक्षणमंत्री शिक्षक समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे महासंघाने त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
सरकारने बैठकीत मान्य झालेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापपर्यंत केली नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष असल्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली.
बारावीच्या परीक्षांवर परिणाम होणार नाही
दोन वर्षांनंतर विद्यार्थी प्रत्यक्ष पद्धतीने परीक्षा देणार आहेत, त्यामुळे त्यांच्या परीक्षेत अडथळा येणार नाही, याची काळजी घेऊन महासंघाकडून केवळ १ दिवसाचे धरणे आंदोलन केले जाणार आहे. सरकारला विद्यार्थी आणि शिक्षकांची काळजी नसली तरी आम्हाला विद्यार्थ्यांची काळजी आहे, असे आंधळकर यांनी अधोरेखित केले.
काय आहेत मागण्या?
- वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देऊन शिक्षकांना वेतन सुरू करावे.
- आयटी विषय अनुदानित करून शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी.
- अघोषित तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे.
- शिक्षकांना १०, २०, ३० वर्षांसाठीची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी.
- सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठीचे प्रशिक्षण त्वरित देण्यात यावे.
- घड्याळी तासांवरील शिक्षकांचे मानधन वाढवून द्यावे.
- शिक्षक, शिक्षकेतरांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत.
- या व इतर मागण्या महासंघाने केल्या आहेत.