मुंबई - बालवयापासूनच विविधांगी सिनेमांमध्ये अभिनय करत आपला वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोटाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ज्युनियर यांचे शरीर खूप अशक्त झाल्याने तसेच खूप उशीर झाल्यामुळे डॉक्टरांनी केमोथेरेपी करण्यासही नकार दिल्याने त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले आहे.
सात वेगवेगळ्या भाषांमाधील अडीचशेहून अधिक सिनेमांमध्ये काम करणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी मुंबई गाठली. लिव्हरला सूज आल्याने त्यांना भूक लागत नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. त्यामुळे त्यांचे वजन झापट्याने कमी होत गेले. अभिनेते जॉनी लिव्हर यांनी ज्युनियर यांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारांचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली, पण कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याने आणि अशक्तपणामुळे डॉक्टरांनी केमोथेरेपी करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. सध्या ते खार येथील घरीच आराम करत असून, लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातील ट्यूमर काढण्यात येईल अशी चर्चा आहे.