Join us

जवानाच्या सतर्क तेने वाचले चिमुरडीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:12 AM

महालक्ष्मी स्थानकात धावत्या लोकलखाली जात असणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचे प्राण वाचवण्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला यश आले आहे. सचिन पोळ या जवानाने ही कामगिरी बजावली.

मुंबई : महालक्ष्मी स्थानकात धावत्या लोकलखाली जात असणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचे प्राण वाचवण्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला यश आले आहे. सचिन पोळ या जवानाने ही कामगिरी बजावली.भिवंडीतील मोहम्मद दिलशान हे त्यांच्या पत्नी आणि पाच वर्षीय मुलीसह महालक्ष्मी स्थानकात लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. दादर दिशेला जाणारी लोकल महालक्ष्मी स्थानकातून रवाना झाली. या वेळी मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीने बोगीत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पाच वर्षीय इजरा नावाच्या मुलीला बोगीत प्रवेश करणे जमले नाही. परिणामी, वेगामुळे इजरा फलाटावरून फलाट आणि बोगीच्या मधल्या जागेत ओढली जाऊ लागली. या वेळी ड्युटीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सचिन पोळने विद्युत वेगाने चपळाई दाखवत त्या मुलीला लोकलपासून दूर ओढले. कुटुंबीयांनी सचिनचे आभार मानले. त्याच्यामुळे महालक्ष्मी स्थानकावरील दुर्घटना टळली.ही घटना स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. चिमुरडीचे प्राण वाचविल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.