मुंबईकर ज्यू बांधवांची 'दिवाळी'
By admin | Published: December 11, 2015 01:45 AM2015-12-11T01:45:30+5:302015-12-11T01:45:30+5:30
हिंदू धर्मियांप्रमाणेच ज्यू धर्मामध्येदेखील दिवाळीसारखा हनुक्का हा सण साजरा केला जातो. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये आलेल्या ज्यू बांधवांनी, आजही ही दिवाळी साजरी करण्या
ओंकार करंबेळकर, मुंबई
हिंदू धर्मियांप्रमाणेच ज्यू धर्मामध्येदेखील दिवाळीसारखा हनुक्का हा सण साजरा केला जातो. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये आलेल्या ज्यू बांधवांनी, आजही ही दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षीदेखील मुंबईत, केवळ पाच हजार इतक्या अल्पसंख्येने उरलेल्या ज्यूंनी एकत्र येऊन, हनुक्का साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
हनुक्का हा साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येणारा एक ज्यू बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. ज्यू प्रार्थनास्थळामध्ये नऊ दीप किंवा मेणबत्त्या लावण्याचा एक धातूच्या स्टँडप्रमाणे आकृतीबंध असतो, याला मिनोरा किंवा हनुक्का असे म्हटले जाते. या हनुक्कामधील मेणबत्त्या लावून हनुक्का साजरा केला जातो. हा सण आठ दिवसांचा चालत असून, त्याच्या प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. हनुक्का साजरा करण्यामागची आख्याइकाही तितकीच जुनी आहे. जेरुसलेममधील ज्यू मंदिरावरील हल्ला परतवून लावल्यावर, तेथील पवित्र ज्योत तेवत ठेवणे क्रमप्राप्त होते. मात्र, ज्योत तेवत ठेवण्यासाठी आॅलिव्हच्या बियांचे तेल काढून, ते शुद्ध करून वापरण्यायोग्य होण्यासाठी आठ दिवसांची आवश्यकता होती आणि केवळ एकच दिवस पुरेल इतके तेल शिल्लक होते, तरीही ज्योत कायम तेवत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यू बांधवांच्या समजुतीप्रमाणे, नवे तेल तयार होईपर्यंत तेलाचा बुधला, सातही दिवस दैवी चमत्काराने आपोआप भरत गेला आणि नवे तेल तयार होईपर्यंत ज्योत तेवत ठेवण्यात यश मिळाले. यामुळे या सात दिवसांना हनुक्का सणाचे स्वरूप प्राप्त झाले आणि तेव्हापासून हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
कोकण किनाऱ्यावर नवगांव येथे ज्यू उतरले. उत्तर कोकणात राहणाऱ्या लोकांप्रमाणे, समाजजीवनामध्ये मिसळून व्यवहार करत, शांततामय सहजीवनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या कालावधीत त्यांनी शनिवारी सुट्टी (शब्बाथ) घेण्याची, ज्यूंचे पवित्र दिवस साजरे करण्याची आणि तेलबियांपासून तेल काढण्याचे कौशल्य जपले. तेल गाळण्याच्या त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना 'शनवार तेली' (कारण ते शनिवारी सुट्टी घ्यायचे) असे नावही मिळाले. १८ व्या शतकामध्ये ज्यू बांधव हळूहळू मुंबईमध्ये स्थायिक होऊ लागले. इस्रायलची निर्मिती झाल्यावर, ३0 हजारांहून अधिक लोकांनी इस्रायलला स्थलांतर केले. आज मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये ५००० च्या आसपास ज्यू शिल्लक राहिले आहेत. विवाह, प्रार्थना, सण, समारंभ अशा माध्यमांतून एकत्र येणे, सुख-दु:खात सामील होत, त्यांनी आपल्या परंपरा जपल्या आहेत. दरवर्षी रोश हाशन्ना, योम किप्पूर, हनुक्का हे सर्व सण ते साजरे करतात. येत्या रविवारी १३ डिसेंबर रोजी नेसेट इलियाहू या फोर्टमधील सिनेगॉगमध्ये हनुक्का साजरा केला जाणार असून, केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार खात्याच्या मंत्री नजमा हेपतुल्ला स्वत: त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.