राणीच्या बागेतील नवीन पाहुण्यांचे प्रवेश लांबणीवर, कागदपत्रे तपासून कंत्राट, पालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:14 AM2017-09-24T03:14:40+5:302017-09-24T03:14:49+5:30
राणीबागेतील पेंग्विनचे कक्ष तयार करण्यासाठी नियुक्त केलेली कंपनी बोगस निघाल्याने महापालिकेने यापुढे सावध पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राणीबागेतील पेंग्विनचे कक्ष तयार करण्यासाठी नियुक्त केलेली कंपनी बोगस निघाल्याने महापालिकेने यापुढे सावध पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील अन्य राज्यांतून तसेच परदेशातून नवीन प्राणी आयात करून त्यांच्यासाठी पिंजरा बांधण्याचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आला आहे. निविदाकारांची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच हे कंत्राट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी मुंबईकरांना बंगालचा वाघ, कोल्हा, तरस, सिंह असे काही परदेशातील पाहुणे पाहण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राणीच्या बागेत गेल्या वर्षी पेंग्विन आणण्यात आले. या पेंग्विनसाठी कक्ष व सर्व व्यवस्था करण्याकरिता नियुक्त केलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने सादर केलेले कामाच्या अनुभवाचे कागदपत्र बोगस असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या कंपनीबरोबरचा करार पालिकेने संपुष्टात आणला. या प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात पालिका काही नवीन प्राणी राणीबागेत आणणार आहे. यासाठी चार निविदाकार पुढे आले आहेत.
१७ नवीन प्राण्यांसाठी पिंजरा बांधण्याचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र या कामामध्ये स्वारस्य दाखविणाºया निविदाकारांची कागदपत्रे तपासून पाहण्यात येणार आहेत.
हे पाहुणे येणार आहेत...
बंगालचा वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा, लांडगा असे प्राणी राणीच्या बागेत लवकरच दाखल होणार आहेत. यासाठी राणीबाग नूतनीकरणाच्या दुसºया टप्प्यात १७ पिंजरे बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प १२० कोटींचा आहे.
पेंग्विन प्रकल्पातील ठेकेदाराची बोगस कागदपत्रे
महापालिकेने ५० कोटी रुपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विनची खरेदी केली. या पेंग्विनला भायखळा येथील राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. गेल्या २३ आॅक्टोबरला त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. हे प्रकरण महापालिका निवडणुकीच्या काळात चांगलेच गाजले. पेंग्विन प्रकल्पातील ठेकेदाराने बोगस कागदपत्रे सादर केली असल्याचे विरोधकांनी उजेडात आणले होते.
५० कोटी रुपयांचे कंत्राट मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करणाºया या कंपनीचे सुमारे १ कोटी ४० लाखांची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे.
मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने डिस्कव्हरी वर्ल्ड सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी सेंटर, वुडलॅण्ड पार्क झू सीटल अॅण्ड कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, लॉस एंजेल्स या तीन कंपन्यांचे शिफारसपत्र बोगस असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला होता.