आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:23 AM2018-09-22T06:23:15+5:302018-09-22T06:23:28+5:30
मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ओळख असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर शुक्रवारी दुपारी २ वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना, येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मुंबई : मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ओळख असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर शुक्रवारी दुपारी २ वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना, येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मालाड, पश्चिम मालवणी येथील रिझवान याकूब इंद्रिसी (१३), इंझामुल राहिमान(१२) व इहझाझ इकबाल शेख (१५) ही तीन मुले आक्सा बीच टॉवरसमोरील समुद्रात पोहायला उतरली. थोड्याच वेळात येथील खड्ड्यात सापडून ती बुडू लागल्याचे मालाड आक्सा बीचवरील मुंबई अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमचे स्वतेज कोळंबकर व जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाण्यात उड्या घेत, त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले, शिवाय त्यांच्या पालकांना बोलावून मुलांना त्यांच्या ताब्यात दिले.