Join us

नाल्याच्या तटभिंतीचे काम ठप्प

By admin | Published: August 01, 2014 3:03 AM

ही तटभिंत बांधण्यात यावी यासाठी पार्वतीबाई प्रतिष्ठान या संस्थेने महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे

कांदिवली : चारकोप पोयसर रोडवरील उदंचन केंद्राला लागून असलेल्या नाल्याची तटभिंत साफसफाईसाठी पाडल्याने सातत्याने रहदारी असलेल्या या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही तटभिंत बांधण्यात यावी यासाठी पार्वतीबाई प्रतिष्ठान या संस्थेने महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे तटभिंत बांधण्याचे काम ठप्प झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका पावसाळ्यापूर्वीच उघड्या नाल्यांची साफसफाई करते. उदंचन केंद्राला असलेल्या चारकोप पोयसरवरील नाल्याची तटभिंत साफसफाईसाठी पाडण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी भिंत बांधून झाली नाही. चारकोप लिंक रोडवर सतत मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पालिकेने खणलेल्या खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. असे अपघात घडू नयेत यासाठी पार्वतीबाई प्रतिष्ठान या संस्थेने आर/दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे भिंत बांधण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केला होता. तीन आठवड्यांनंतर महापालिकेकडून संस्थेला पत्र आले की, ‘आपण मोठ्या नाल्याविषयी विचारणा केली असून हा विषय हा कार्यकारी अभियंता पर्जन्य जलवाहिनी या खात्याशी निगडित आहे. आपला अर्ज त्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.’ हा नाला लिंक रोडखालून आल्याने नाल्याचा सुमारे १५० फूट भाग झाकला गेला आहे. लिंक रोडच्या अलीकडे व चारकोप पोयसर लिंक रोडच्या कोपऱ्याला नाल्याला लागूनच बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या विकासकाने ४0 फूट नाला झाकला असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्लॅब टाकल्यामुळे साफसफाईसाठी उर्वरित नाल्याची तटभिंत पाडण्यात आली आहे. तब्बल चार ठिकाणी तुटलेली तटभिंत कधी उभी राहणार याकडे नागरिकांचे डोळे लागले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)