तरुणाईची मते ठरणार निर्णायक!

By admin | Published: January 5, 2017 06:36 AM2017-01-05T06:36:09+5:302017-01-05T06:36:09+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून तरुणांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण गुरुवारी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत सुमारे ३६ टक्के मतदार

Junkies can be decisive! | तरुणाईची मते ठरणार निर्णायक!

तरुणाईची मते ठरणार निर्णायक!

Next

चेतन ननावरे ,मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून तरुणांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण गुरुवारी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत सुमारे ३६ टक्के मतदार हे चाळिशीमधील असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे साहजिकच आगामी निवडणुकीत तरुणाईची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नव्याने जाहीर होणाऱ्या मतदार यादीत मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत एकूण २४ लाख ३७ हजार ९०७ मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यात १३ लाख ४० हजार ३६६ पुरुष, १० लाख ९७ हजार ४३९ महिला आणि १०२ इतर मतदारांचा समावेश आहे. या एकूण मतदारांत १८ ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या ८ लाख ८० हजार ६५५ म्हणजेच ३६.१२ टक्के इतकी आहे. याउलट ४० ते ५९ वयोगटातील १० लाख २१ हजार ९७ आणि ६० वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ५ लाख ३६ हजार १५५ इतकी आहे. यावरून निवडणुकीवर तरुणाईचा वरचष्मा दिसून येईल, यात शंकाच नाही.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला मतदारांसह यंदा मतदार नोंदणीत इतर मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रथमच तृतीयपंथी मतदारांचा आकडा शहरात शंभराच्या घरात पोहोचला आहे. दरम्यान, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महापालिका निवडणुकीत मतदारांचा आलेख चढता दिसून आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महापालिका निवडणुकीत ३६ हजार ८८१ मतदारांची भर पडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासोबत महापालिका आणि राज्य शासनाने केलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळेच हा आकडा वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Web Title: Junkies can be decisive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.